सुरेश बागवे- कडावल -गोठ्यातील गोधन घटल्यामुळे पुरेशा प्रमाणात शेणखत नाही. शेत आणि जीवन जाळणाऱ्या धोकादायक रासायनिक खतांवरच शेतीचा सर्व डोलारा उभा असून दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे शेतकरी दिवसेंदिवस हैराण होत आहे. त्यातच वन्य प्राण्यांचा उपद्रव, निसर्गाचा लहरीपणा तसेच अल्पभात उत्पादन व कमी दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली असून, त्यांची अवस्था ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी झाली आहे. यंदा पावसाचे वेळीच आगमन झाल्यामुळे कडावल परिसरात भातपेरणीची कामेही वेळेत पार पडली. सध्या येथील शेतकरी उखळीची नांगरट कण्यात व्यस्त झाले आहेत. शेतनांगरणी जोरात सुरू असली, तरी बियाणे, खते, जनावरे, मजुरी आणि शेतीच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर सर्व बाबींना महागाईने ग्रासल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पारंपरिक भात बियाण्यांचा वापर टाळत सुधारित व संकरित वाणांना पेरणीसाठी प्राधान्य दिले आहे. कडावल परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा एककाडी, दोन काडीसारख्या संकरित वाणांसह इतर आधुनिक वाणांचा सर्रास वापर केला आहे. यामध्ये लोकनाथ, गोरखनाथ, सुरूची, मोती गोल्ड, सारथी, स्वाद, सुपरसोना, रुपा फ्रंटलाईन तसेच इतर वाणांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व वाणांना रासायनिक खतांसह शेणखताची आवश्यकता असते. मात्र, गोठ्यातील गुरांची संख्या घटल्यामुळे शेतकऱ्यांकडे पुरेशा प्रमाणात शेणखत उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीची सर्व भिस्त धोकादायक रासायनिक खतांवरच आहे. शेतीचा सर्व डोलारा शेत आणि माणसाचे जीवन जाळणाऱ्या रासायनिक खतांवरच अवलंबून असताना दुसरीकडे वाढत्या महागाईचे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतीशी निगडित सर्वच बाबींमध्ये महागाईने शिरकाव केला आहे. यंदा शेतकऱ्यांना बैलजोडीसाठी किमान ४० ते ५० हजार रुपये मोजावे लागले. पॉवर ट्रेलरचे भाडे प्रतितास साडेतीनशे रुपये झाले आहे, तर प्रतिमजूर मजुरीचा दर ४०० रुपयांवर पोहोचला आहे. सुधारित व संकरित बियाण्यांच्या किमतीमध्येही काही प्रमाणात वाढ झाली आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना हंगामाचा सामना करावा लागत आहे. कुडाळ तालुका भौगोलिक परिस्थितीमुळे खलाटी आणि वलाटी अशा दोन भागात विभागला गेला आहे. (वार्ताहर)अल्प दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईतगगनाला भिडणाऱ्या महागाईमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असताना दुसरीकडे भाताच्या दरात सुधारणा झालेली नाही. प्रति क्विंटलचा दर सरासरी एक हजार रुपयांच्या आसपास स्थिरावला आहे. शेतीशी संबंधित वाढती महागाई, वन्यप्राण्यांचा उपद्रव, निसर्गाचा लहरीपणा, कमी उत्पादन व भात उत्पादनास मिळणाऱ्या अल्प दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.
अडचणींच्या विळख्यात पारंपरिक शेती
By admin | Published: June 26, 2015 10:08 PM