सुधीर राणे
कणकवली : कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या चित्रकला विभाग व महाराष्ट्र शासन पर्यावरण सेवा योजना विभागामार्फत नेहमी पर्यावरण पूरक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी विद्यार्थ्यांच्या सहभागातून पारंपारिक आकाशकंदील व किल्ले बनविण्यात आले. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजाला देण्यात आला.मार्च २०२० पासून कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे शाळा बंद आहेत .विद्यार्थी व शिक्षक यांचा प्रत्यक्ष संपर्क तुटलेला आहे .परंतु या काळात शिक्षण बंद नसून ते मोबाईलच्या माध्यमातून सुरूच आहे. आतापर्यंत मुलांना मोबाईल हातात देणे धोकादायक आहे असे अनेक पालक म्हणत होते. मात्र, आता अभ्यासाकरिता मुलांच्या हातात मोबाईल द्यावा लागत आहे. गेले आठ ते नऊ महिने सतत घरात बसून मोबाईलवर शिक्षण घेत असताना प्रत्येक मुलातील बालपण पूर्णपणे हरवून गेले आहे .अशावेळी मुलांनी या मोबाईलच्या जाळ्यातून थोडा वेळ तरी बाजूला होऊन आपले हरवलेले बालपण मुक्तपणे जगावे, आनंद घ्यावा व आपल्यातील कलागुणांना वाव करून द्यावा. त्यातूनच पर्यावरणाचेही संरक्षण करून समाजाला एक प्रेरक संदेश द्यावा या उद्देशाने विद्यामंदिर हायस्कूलच्या चित्रकला विभाग व पर्यावरण सेवा योजनेचे प्रमुख प्रसाद राणे यांनी मुख्याध्यापक बि.डी.सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक आकाशकंदील व किल्ले बनवा उपक्रमाचे आयोजन केले होते .पारंपारिक आकाशकंदिल उपक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीचे ३००विद्यार्थी सहभागी झाले होते तर किल्ले बनवा उपक्रमांमध्ये ४६ गट सहभागी होऊन शहरातील विविध भागात घरोघरी किल्ले बनविले आहेत. आकाश कंदील बनविताना विद्यार्थ्यांनी थर्माकोल व प्लास्टिक न वापरता कागद ,पुठ्ठा ,बांबूच्या काठ्या अशा पर्यावरणपूरक वस्तूंचा उपयोग करून अतिशय आकर्षक आकाशकंदील बनविले. त्याद्वारे ३०० घरांना चायनामेडच्या प्लास्टिकच्या कचऱ्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. तर माती, दगड, रान, नैसर्गिक रंग यांचा उपयोग करून अतिशय उत्कृष्ट असे शिवकालीन किल्ले सुद्धा बनविले आहेत .प्रसाद राणे यांनी घरोघरी जाऊन किल्ल्याची पाहणी करत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले. तर आकाश कंदील बनविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सोशल डिस्टंसिंगचा वापर करत शाळेमध्ये बोलावून त्यांनाही प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांच्या कलाकौशल्याचेही कौतुक केले हा उपक्रम यशस्वी होण्याकरिता प्रशालेचे मुख्याध्यापक बि.डी. सरवदे, पर्यवेक्षक पी.जे.कांबळे, जे.जे. शेळके, व्हि.एच. शिरसाठ इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.