मालवण : मालवणात उन्हाळी सुट्टीची मजा लुटण्यासाठी हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटक तसेच चाकरमानी यांनी मालवणनगरी फुलून गेली आहे. पर्यटन व्यवसायही बहरात असून स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा तसेच किल्ले सिंधुदुर्ग दर्शनाला पर्यटकांनी अधिक पसंती दिली आहे. बुधवारपासून पर्यटकांनी मालवण ‘हाऊसफुल्ल’ झाल्याचे चित्र आहे. एकीकडे पर्यटन वाढत असताना मात्र अरुंद रस्त्यांअभावी वाहतूक कोंडी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शनिवारी सकाळपासून पर्यटकांचा ओघ वाढता असल्याने दुपारी तीनच्या सुमारास मालवण भरड ते देऊळवाडा या दीड किलोमीटर अंतरात सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.दरम्यान, दुपारच्या वेळी मालवणहून मुंबई येथे जाणाऱ्या खासगी गाड्यांमुळे दुपारच्या सत्रात वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे बोलले जात आहे. पोलीस व वाहतूक प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहावे, असाही सूर स्थानिक वाहनधारक व्यक्त करत आहे. मालवणात पर्यटकांनी आठवडाअखेरीस तुफान गर्दी केली आहे. गुरुवार सायंकाळपासूनच पर्यटकांनी मालवण किनारपट्टी गजबजून गेली. अपुरे पार्किंग, अरुंद रस्त्यांमुळे मालवण बाजारपेठ आणि तारकर्ली देवबाग मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी दिसून येत होती. पर्यटकांच्या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता पोलीस प्रशासनाने अधिक पोलीस कर्मचारी तैनात करावेत, अशीही मागणी होत आहे. मालवण शहरातील अपुरी पार्किंग व्यवस्था, अरुंद रस्ते यामुळे मोठी वाहतूक कोंडी सकाळपासून निर्माण झाली होती. मालवण देऊळवाडा ते बाजारपेठ मार्गावर दिवसभरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. (प्रतिनिधी)खासगी बस वाहतूक कोंडीस कारणीभूत?मालवण येथून मुंबई येथे जाणाऱ्या खासगी बसेस एसटी बसस्थानकानजीक प्रवासी भरतात. दुपारी ३ ते ४ या वेळात किमान सात ते आठ खासगी बसेस प्रवासी भरण्यासाठी थांबत असल्याने रस्त्यांवर दोन्ही बाजूने लांबलचक वाहनाच्या रांगा लागत आहे. शनिवारी दुपारी स्थानिक रिक्षाचालक व खासगी बसचालक यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे प्रवासी भरण्यासाठी खासगी बसेस धारकांनी सागरी मार्गाचा अवलंब करावा, अशी मागणी करताना पोलिसांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. खोळंबून रहावे लागत असल्याने साऱ्या प्रकाराबाबत प्रवासी व पर्यटकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
मालवणात वाहतूक कोंडीने हैराण
By admin | Published: May 14, 2016 11:42 PM