कणकवली: कणकवली तालुक्यातील वारगाव येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने चोरट्या दारू वाहतुकीवर पुन्हा कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५८ लाखाच्या दारूसह ६९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई- गोवा महामार्गावर वारगाव येथे बुधवारी मध्यरात्री एक वाजता ही कारवाई करण्यात आली. गोव्याहून मुंबईकडे बिनधास्तपणे ही चोरट्या दारूची वाहतूक केली जात होती.गोव्यातून राज्यात येणाऱ्या दारू वाहतुकीवर नियंत्रण येण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक आर.बी.शेळके, हवालदार राजू जामसंडेकर यांना दारूची चोरटी वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावरून एका ट्रकमधून होत असल्याची माहिती मिळाली. बुधवारी रात्री वारगाव येथे सापळा रचून दारूसह ट्रक असा ६९ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यादरम्यान ट्रक चालक पसार झाला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, उपनिरीक्षक आर. बी.शेळके, सहायक उपनिरीक्षक गुरु कोयंडे, हवालदार राजू जामसंडेकर, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, आशिष जामदार, बसत्याव डिसोजा, आरमारकर, बाळू पालकर, नार्वेकर यांच्या पथकाने केली. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत. या घटनेतील पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे.
वारगाव येथे विना परवाना दारू वाहतूक रोखली, ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त
By सुधीर राणे | Published: November 09, 2023 3:38 PM