सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत ४६८ लाभार्थींना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी ३८ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर यांनी दिली.जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत मुली व महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देणे, योजनांतर्गत फळप्रक्रिया, फॅशन डिझायनिंग, ब्युटीपार्लर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये फळप्रक्रिया प्रशिक्षणासाठी ९० लाभार्थींची निवड करून प्रत्येक लाभार्थीसाठी ३३०० रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणासाठी ८५ लाभार्थींची निवड करण्यात आली असून, प्रत्येकी ३५०० रुपये अनुदान खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी ३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, तर ब्युटीपार्लर प्रशिक्षणासाठी १०० लाभार्थींची निवड करण्यात आली असून, प्रत्येक लाभार्थ्यावर ३००० रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे.प्रत्येक लाभार्थीसाठी ३,८०० रुपये निधी खर्च करण्यात येणार असून त्यासाठी ६ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. अशाप्रकारे विविध योजनांसाठी ३८ लाख निधीची तरतूद करण्यात आली असून आतापर्यंत विविध योजनेअंतर्गत ४६८ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती सभापती माधुरी बांदेकर यांनी दिली.अद्यापही सायकल पुरविणे व एमएस-सीआयटी प्रशिक्षणासाठी प्रस्तावांची आवश्यकता असून, गरजू लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन सभापती माधुरी बांदेकर यांनी केले आहे.सायकल योजनेसाठी ४० लाभार्थींची निवडमहिलांना विविध साहित्य पुरविणे योजनेअंतर्गत पिठाची गिरणी (घरघंटी), शिलाई मशीन (शिवण यंत्र) व पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींना सायकल वाटप आदी योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये घरघंटी पुरविणे योजनेसाठी ८५ लाभार्थींची निवड करण्यात आली असून, प्रति लाभार्थी १२,६०० रुपये अनुदान खर्च करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी १८ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना शिलाई मशीन पुरविणे योजनेमध्ये ६८ लाभार्थींची निवड करण्यात आली असून, प्रति लाभार्थी ५,३२५ रुपयांचा निधी खर्च होणार आहे. त्यासाठी ५ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींना सायकल पुरविणे योजनेसाठी ४० लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. या सर्व लाभार्थ्यांना तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सभापती माधुरी बांदेकर यांनी दिली.