चिपळूण : गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांना आजही कोकण रेल्वेने दणका दिला. गाड्या उशीरा धावत असल्याने अनेक गणेशभक्त गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी वेळेवर गावी पोहचू शकले नाहीत. महामार्गावरही आज वाहनांची गर्दी होती. मात्र, बाजारपेठेत वर्दळ कमी होती. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत घरोघरी गणरायाचे उत्साहात आगमन झाले. कोकणवासियांचा गणेशोत्सव हा लाडका सण आहे. या काळात असंख्य भाविक मिळेल त्या वाहनाने कोकणात येत असतात. यावर्षी कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या फुल्ल झाल्या. शिवाय एस. टी. बस, खासगी गाड्यांचीही महामार्गावर संख्या मोठी होती. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्तांना घरी पोहचण्याची घाई झाली होती. परंतु, गाड्या उशीरा असल्याने त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. सीएसटी-मडगाव गणपती स्पेशल ही गाडी २ तास २० मिनिटे उशीराने, कोकणकन्या एक्स्प्रेस ४० मिनिटे उशीराने, दादर-सावंतवाडी एक्स्प्रेस १ तास उशीराने, मंगला एक्स्प्रेस १ तास २० मिनिटे उशीराने, मत्स्यगंधा १ तास २० मिनिटे उशीराने, भावनगर-कोचिवली २ तास १५ मिनिटे उशीराने, मडगाव-सावंतवाडी पॅसेंजर १ तास उशीराने, सावंतवाडी-दादर गणपती स्पेशल १ तास उशीराने, तर मंगलोर-सीएसटी ४ तास उशीराने धावत आहेत. जनशताब्दी ४० मिनिटे व नेत्रावती एक्स्प्रेस १ तास उशीरा धावल्या. गणेशभक्तांना आपल्या घरी पोहचण्यासाठी उशीर झाला. रेल्वे गाड्या उशीरा धावत असल्याने चिपळूण रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांचे, लहान मुलांचे हाल झाले आहेत. त्यांना प्यायला पाणी किंवा खायला अन्न मिळणे अवघड झाले होते. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. महामार्गावर खासगी वाहनांची गर्दीही वाढली होती. अनेक ठिकाणी बंद पडलेल्या गाड्या दिसून येत होत्या. त्यामुळे तारेवरची कसरत करतच मुंबईकरांना गाव गाठावे लागले. (प्रतिनिधी)तेहतीस हजार गणपतीचिपळूण तालुक्यात आज गुरुवारी १७ सार्वजनिक तर ३३ हजार २० घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. गेले दोन दिवस गणेशमूर्ती पाऊस असल्याने वाहनातूनच नेण्यात आल्या. रिक्षा, टेम्पो व कारचा गणेशमूर्ती नेण्यासाठी वापर झाला. यावर्षीही ‘जय मल्हार’ मूर्तीची क्रेझ कायम होती. तर ‘बाहुबली’च्या रुपातील मूर्तीही दिसत होत्या. याचप्रकारच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी होती.
रेल्वे अजूनही उशीराच
By admin | Published: September 17, 2015 11:26 PM