आंबोली : येथील मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने शंभर मीटर अंतरावर, पंधरा दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी ट्रक कोसळून चालक मृत्युमुखी पडला होता त्याच ठिकाणी पुन्हा टेम्पो दरीत कोसळता कोसळता वाचला. खड्डा चुकविण्याच्या नादात किंवा चालकाने मद्यपान केल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.कुडाळ-झाराप येथील समीर शहा यांच्या मालकीचा टेम्पो कोल्हापूर येथून सावंतवाडीच्या दिशेने जात असताना एका धोकादायक वळणावर असलेला मोठा खड्डा चुकविण्याच्या नादात टेम्पो दरीच्या दिशेने गेला. चालकाचे टेम्पोवरचे नियंत्रण सुटून टेम्पो दरीच्या कठड्यावर जाऊन अधांतरी अडकून राहिला. या ठिकाणी संरक्षक कठडे नसूनही केवळ दैव बलवत्तर म्हणून ट्रक दरीत न कोसळता अधांतरी लकटत राहिला.चालक युसूफ शेख (२९) हा शिताफीने टेम्पोच्या बाहेर पडला. अन्यथा अनर्थ घडला असता. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास सावंत करीत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर बांधकाम विभागाला खड्डे बुुजवण्याची विनंती वारंवार केली असतानाही हा खड्डा बुजविण्यात आला नाही. शिवाय येथे संरक्षक कठडेही नाहीत.ठोस उपाय हवाधोकादायक वळणाचा अंदाज पाहता याठिकाणी ठोस उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे भविष्यात येथे मोठा अपघात होण्याची दाट भीती आहे.