वैभववाडी : वैधानिक इशारा नसलेल्या तंबाखुजन्य वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आराम बसवर वैभववाडी पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी बसच्या चालकांसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान २४ हजाराच्या मुद्देमालांसह आराम बस जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई करुळ तपासणी नाक्यावर करण्यात आली.मुंबईहून गोव्याकडे जाणारी आराम बसक्रमांक (एमएम ०७, पी-८२००) करूळ तपासणी नाक्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेंबल मारूती सोनटक्के, संदीप राठोड या कर्मचाऱ्यांनी तपासणी करीता थांबविली. गाडीची तपासणी करताना पोलिसांना सामान कक्षात अनेक पार्सल दिसून आली. यातील काहीची पाहणी केली असता एकाबॅगेत हुक्का ओढण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी, कोळसा दिसून आला.याशिवाय दुसऱ्या एका बॅगेत वैधानिक इशारा नसलेली सिगारेटची पाकिटे निदर्शनास आली. त्यामुळे ही माहिती पोलिसांनी वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अधिक चौकशी करून आरामबस वैभववाडी पोलीस स्थानकात आणली. त्या बसमधील सर्व साहित्याची पुन्हा तपासणी केली. तपासणीअंती त्यांनी बसमध्ये वैधानिक इशारा नसलेल्या २४ हजार रूपये किमंतीच्या सिगारेट आढळून आल्या.या प्रकरणी पोलिसांनी गाडीचे चालक इंदरसिंग हिरालालजी गुजर, (४५) व क्लिनर भैरू शंभु नाथ, (४३, दोन्ही रा. मध्यप्रदेश) यांच्यावर तंबाखुजन्य प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी १० लाख रूपये किमंतीची आरामबस देखील जप्त केली आहे. या दोन्ही संशयितांना सोमवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.प्रवाशांना दुसऱ्या गाडीतून पाठविलेपोलिसांनी आराम बसवर कारवाई केल्यामुळे या गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडीतून गोव्याच्या दिशेने पाठविण्यात आले. आराम बसमध्ये सुरूवातीला हुक्का ओढण्यासाठी लागणारी भांडी, कोळसा पोलीसांच्या हाती लागल्यामुळे खळबळ माजली होती. परंतु त्यानंतर पोलिसांनी वैधानिक इशारा नसलेल्या सिगारेटचा आधार घेत गुन्हा दाखल केला. हुक्का ओढण्यासाठी लागणारी भांडी वाहतूक करण्यास परवानगीची गरज नाही का असे विचारले असता पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी परवानगी नसल्याचे स्पष्ट केले.
तंबाखूजन्य वस्तूंची वाहतूक; आरामबस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 11:40 AM
Tobacco Ban Sindhudurg- वैधानिक इशारा नसलेल्या तंबाखुजन्य वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आराम बसवर वैभववाडी पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी बसच्या चालकांसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान २४ हजाराच्या मुद्देमालांसह आराम बस जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई करुळ तपासणी नाक्यावर करण्यात आली.
ठळक मुद्देतंबाखूजन्य वस्तूंची वाहतूक; आरामबस जप्त दोघांवर गुन्हे दाखल : करुळ तपासणी नाक्यावर कारवाई