सावंतवाडी: सावंतवाडीतील युवकांचा भाजप तालुकाध्यक्ष रमेश रेडेकर यांच्याशी किरकोळ वाद आणि त्यानंतर गडहिंग्लज येथील कुख्यात गुंड श्रीकांत शिगटे याने रेडेकर यांना दिलेली धमकी यातूनच पुढे घडत गेलेल्या घटनामुळे सावंतवाडीतील चार युवकांना मोक्काच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. शिगटे याच्यावर यापूर्वीच नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याला साह्य केल्याने या चौघांवर ही मोक्का लावण्यात आला आहे. मात्र या विरोधात आरोपी उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.
सावंतवाडीतील नेल्सन ईजामाईल फर्नांडिस उर्फ बाबा नेल्सन हा गोवा बनावटीची अवैध दारू चंदगड आजरा व गडहिंग्लज या परिसरात घालतो. याची सर्व दारू गडहिंग्लज येथील श्रीधर शिंगटे विकत घेतो आणि तो छोट्या छोट्या व्यावसायिकांना पुरवतो. तसेच काही दारू ही हॉटेल व्यावसायिकांना देत असतो. अनेक वर्षे हा बाबा नेल्सन यांच्याकडून दारू घेतो. शिगटे अवैध दारूतील मोठा तस्कर मानला जातो. त्याची आजरा गडहिंग्लज, चंदगड परिसरात मोठी दहशत आहे. यातूनच त्याला अनेक जण घाबरतात. त्याच्यावर आतापयृंत वेगवेगळे असे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातूनच सिंधुदुर्गमधील अनेक जण खुलेआम शिगटे यांच्याच जीवावर दारूचा व्यवसाय करत असतात.
मात्र जानेवारी महिन्यात बाबा नेल्सन यांच्यासोबत असणाºया युवकांसोबत रात्रीच्या वेळी रेडेकर यांची बाचाबाची झाली होती. ही घटना शिगटे याला समजताच त्याने रेडेकर यांना धमकी देण्यास सुरूवात केली. त्याचेच पर्यावसण हाणामारीत झाले होते. या विरोधात रेडेकर यांनी गुरूवारी पोलिसांत तक्रार केल्यानंतर आजरा पोलिसंनी श्रीधर शिगटे सह सावंतवाडीतील चौघांना ताब्यात घेतले. पहिल्यांदा पोलिसांनी रेडेकर यांच्यातक्रारी वरून पाचही जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता मोक्का अंर्तगत कारवाई करण्यात आली आहे.
मात्र किरकोळ वादातून सावंतवाडीतील चार युवकांना मोक्काच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने अनेकांना आर्श्चय वाटत आहे. कारण चेतन साटेलकर, यशवंत कारिवडेकर, कृष्णा म्हापसेकर या युवकांवर आतापर्यंत एकही गुन्हा दाखल नाही. तर बाबा नेल्सन यांच्यावर दारूच्या संबधात गुन्हा दाखल होता. पण यातील चारही जण गंभीर गुन्ह्यात बसत नाहीत. त्यामुळे या कारवाईमुळे सगळ्यांना आर्श्चयाचा धक्काच बसला आहे.मात्र किरकोळ वादातून खंडणी सारखा प्रकार आहे. मात्र अचानक मोक्का लावल्याने आरोपींना चांगलाच धक्का बसला आहे. आरोपी या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.