संदीप बोडवे, मालवण : पर्यटन हंगामाच्या काळात मालवणात येणार्या पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंती, स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंगबरोबरच देवबाग, तारकर्ली येथे वॉटर स्पोटर््सचा आनंद पर्यटक लुटत आहेत. देवबाग येथील त्सुनामी आयलंड देशविदेशातील पर्यटकांसाठी हॉटस्पॉट ठरला आहे. सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान काहीशा मरगळलेल्या असलेल्या मालवणच्या पर्यटन हंगामाने १५ मे नंतर पुन्हा एकदा उभारी घेतली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत कडक सुरक्षा व्यवस्था तसेच ठिकठिकाणी होत असलेल्या वाहनांच्या तपासणीमुळे पर्यटकांनी मालवणकडे काही प्रमाणात पाठ फिरविली होती. यामुळे ऐन पर्यटन हंगामात मालवण, तारकर्ली, देवबाग, वायरी भागात पर्यटनात मंदी जाणवत होती. १६ मे रोजी निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पर्यटकांनी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मालवणकडे धाव घेतली आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील पर्यटक तसेच मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी मालवण येथे आले आहेत. किल्ला भ्रमंती बरोबरच स्नॉर्कलिंग व्यावसायिकांनी सुरु केलेल्या एक खिडकी योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यटकांची संख्या वाढती असल्यामुळे शहरातील अरुंद रस्त्यांवर वाहतुकीचा ताण जाणवत आहे. वाहन चालकांबरोबरच पोलीस यंत्रणेलाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. भरड नाका ते बंदर जेटीपर्यंत जाणारा रस्ता अरुंद आहे. रस्त्याच्या दुतर्फा बाजारपेठ असल्याने या भागात ग्राहकांची तसेच लहानमोठ्या वाहनांची वर्दळ असते. बंदरजेटी येथे पर्यटक थांबत असले तरीही या ठिकाणी प्रशस्त पार्किंगची सोय नाही. बर्याचवेळा पर्यटकांना समुद्रकिनार्यावर वाहने उभी करावी लागतात.
मालवणात पर्यटन हंगामाने घेतली उभारी
By admin | Published: May 26, 2014 12:49 AM