चिपळूण : दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे. सगळीकडे विद्युत रोषणाईचा झगमगाट, फटाक्यांची आतषबाजी सुरु असतानाच आदिवासींच्या पाड्यांवर मात्र अंधार असतो. या उपेक्षित घटकांनाही दिवाळीचा आनंद लुटता यावा, त्यांनाही इतरांप्रमाणे मुख्य प्रवाहात येऊन सर्वांच्या आनंदात सहभागी होता यावे, यासाठी फॅण्ड्रीच्या टीमने ‘एक करंजी मोलाची’ या उपक्रमाद्वारे कोळकेवाडी येथील आदिवासी पाड्यात फराळाचे वाटप केले. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे!! जाग यावी सृष्टीला, की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा!! या काव्याप्रमाणे चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडीतील आदिवासी पाड्यांमध्ये दिवाळीच्या दिवशी फराळाचे वाटप केले. २५ मे २0१४मध्ये प्रोजेक्ट फॅण्ड्रीचा जन्म झाला. त्यानंतर फॅण्ड्रीच्या ग्रुपने मातृमंदिर येथील अनाथ मुलींसाठी कपडे व साहित्य उपलब्ध करून दिले. कोळकेवाडी येथील आदिवासी पाड्यातील मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी वाढावी, यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्यात आवड निर्माण केली. आता या अनाथ, आदिवासींच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलावा, यासाठी एक करंजी हा उपक्रम राबवण्यात आला. फॅण्ड्रीचे स्वप्नील चिले, मृणाल करंजकर यांनी आदिवासी पाड्यावर फराळ भेट दिला. फराळ, फटाके रोषणाई याद्वारे आपल्या घरात दिवाळीचे रंग दिसतात, पण समाजात असे काही उपेक्षित लोक आहेत, ते या आनंदापासून लांब राहतात. त्यांना जवळ आणण्याचा फॅण्ड्री सतत प्रयत्न करत असते. या लोकांसाठी आपण काहीतरी करायला हवे, त्यांनाही सामान्यांसारखे जगता आले पाहिजे असे तरुणाईला वाटते. यासाठीच अध्यक्ष रवी चाचे व सागर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु केला आहे. वर्षभरात विविध उपक्रम राबवून फॅण्ड्रीने कार्याचा ठसा उमटवला आहे. (प्रतिनिधी)कोळकेवाडी आदिवासी पाड्यावर फॅण्ड्रीतर्फे फराळाचे वाटप.फॅण्ड्री चित्रपटातून घेतली तरुणांनी प्रेरणा.समाजातील उपेक्षित घटकांना उत्सवाचा आनंद देण्याचा प्रयत्न.उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याचा फॅण्ड्रीचा प्रयत्न.समाजातील उपेक्षितांसाठी धावली फॅण्ड्रीची टीम.
फॅण्ड्रीच्या उपक्रमामुळे आदिवासींची दिवाळी गोड...!
By admin | Published: November 11, 2015 8:38 PM