सावंतवाडी : सावंतवाडी येथील समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मुलींना त्रास देणे व जेवण न देणे असे प्रकार सुरू आहेत. या तक्रारीवरून वसतिगृहाचे अधीक्षक डी.एस.जाधव, लिपिक धनलता चव्हाण या दोघांची चौकशी करून बदली केली जाईल, असे लेखी आश्वासन समाजकल्याण विभागाचे निरीक्षक गोसावी यांनी उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मंत्री धनंजय मुंडे यांच्या कानी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब घातली. मुंडे यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचना केल्यानंतर लिपिक चव्हाण यांच्या बदलीचे आदेश निघाले.आंबोली येथील मागासवर्गीय समाजातील अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला वसतिगृहात त्रास देणे, जेवणाचा डबा न देणे असे प्रकार केले जात आहेत. ती आजारी असताना तिला उपचारासाठी दाखल न करता ज्या वसतिृहातील मुलींनी मदत केली त्या मुलींनाही त्रास दिला जात आहे.
याबाबत तिचे आई-वडील अर्चना व अरुण चव्हाण यांनी समाजकल्याण कार्यालयाजवळ उपोषण छेडले. या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य सुरेश गवस, तानाजी वाडकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम, महिला जिल्हाध्यक्ष अॅड. रेवती राणे, उदय भोसले, संदीप राणे, सत्यजित धारणकर, भाऊ पाटील, रंजना निर्मले आदी उपस्थित होते. यावेळी सुरेश गवस, रेवती राणे, कदम, भोसले यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले.वडिलांची कैफियतमुलीचे वडील म्हणाले, माझ्या मुलीला गेले काही महिने अधीक्षक जाधव व लिपिक चव्हाण त्रास देत आहेत. अधीक्षक जाधव यांनी माझ्या मुलीला वडील कुठल्या राजकीय पक्षात काम करतात का? असे प्रश्न विचारून त्रास दिला.तानाजी वाडकर यांनी या प्रकरणी लिपीक धनलता चव्हाण यांचे वागणे योग्य नाही. त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी, अशी मागणी केली.