वैभव साळकरदोडामार्ग : तिलारी घाट उतरत असताना एका तीव्र उताराच्या वळणाचा अंदाज चुकला व ट्रक थेट कठड्याला जाऊन धडकल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र ट्रकाने संपूर्ण रस्ताच व्यापल्याने दुचाकी व्यतिरिक्त इतर वाहनांसाठी हा रस्ता बंद झाला. वाहने अडकून पडली. वाहनचालकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तब्बल सोळा तासानंतर क्रेनच्या साह्याने ट्रक काढल्याने वाहतुक सुरळीत झाली.एक मालवाहु ट्रक सोमवारी रात्री घाटमाथ्यावरून तिलारी घाट मार्गे गोव्याला जात होता. चालकास हा घाट नवा होता. घाटाच्या पूर्वार्धातच तीव्र उतार पाहून चालकाची भीतीने गाळण उडाली. ट्रक तीव्र उताराच्या वळणावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक संरक्षक कठड्याला धडकला. परिणामी ट्रक खोल दरीत कोसळण्यापासून बचावला व मोठा अनर्थ टळला. ट्रक रस्त्यातच अडकून पडल्याने फक्त दुचाकी जाण्यासाठी मार्ग शिल्लक राहिला. चारचाकी व इतर वाहनांसाठी मार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली.गोव्याहून पर्यटनाचा आनंद लुटून स्वगावी परतणाऱ्या व पर्यटनासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा खोळंबा झाला. मंगळवारी सकाळच्या सत्रातील एसटी बसेसना देखील याचा फटका बसला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. मंगळवारी सकाळी जेसीबीच्या साह्याने ट्रक बाजूला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. मात्र यात ट्रक काहीसा बाजूला झाल्याने चारचाकी वाहने मार्गस्थ झाली. शिवाय काही एसटी बस चालकांनी देखील बस काढण्यात यशस्वी झाले. तब्बल सोळा तासानंतर मंगळवारी सकाळी घाटातून बाहेर काढला व रस्ता खुला झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
Sindhudurg: तिलारी घाटात ट्रकला अपघात; घाटातील वाहतूक बंद, प्रवाशांची मोठी गैरसोय
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 28, 2024 7:13 PM