सावंतवाडी : सह्याद्रीच्या पट्ट्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सांगेली, सावरवाड व कलंबिस्त या गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगेली गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून अधिकारी तसेच ग्रामस्थ यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी त्यांनी सरसकट पंचनामे करा कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सक्त सूचना दिल्या.वळीव पावसामुळे तसेच वादळी वाऱ्याने सह्याद्रीच्या पट्ट्यात तीन ते चार गावांना जोरदार तडाखा बसला. यात सांगेली गावाचे जवळपास 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांवर मोठमोठी झाडे कोसळली तसेच बागायती नष्ट झाल्या आहेत. या नुकसानीची पंचनामे महसूल विभागाने गेल्या दोन दिवसांपासून सुरू केले आहेत.आतापर्यंत नुकसानीचा आकडा जवळपास निश्चित झाला असला तरी सरसकट पंचनाम्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्वाधिक नुकसान झालेल्या सांगेली गावाला भेट दिली. यावेळी सांगेली ग्रामपंचायतमध्ये अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेतली.या बैठकीत ग्रामस्थ पुनाजी राऊळ तसेच पंढरी राऊळ यांच्यासह अनेकांनी सातबारावर झाडांची नोंद नाहीत तसेच सर्वाधिक झाडे कोसळून नुकसान झाले आहे. पण पंचनाम्यात सातबारा वर पीक पाण्याची नोंद नसल्याने झाडे दाखवण्यात येत नाहीत अशी कैफियत पालकमंत्र्यांसमोर मांडली. त्यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी सरसकट पंचनामे करा जागेवर जाऊन फोटो घ्या आणि त्याचा रितसर अहवाल एका दिवसात तयार करा आणि मला बुधवारी तो मुंबई येथे जिल्हाधिकारी यांच्या सहीने पाठवा असे कृषी व महसूलच्या अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच नुकसान झालेल्या भागाची पाहणी ही त्यानी केली.मंत्री चव्हाण यांचे गावचे सरपंच लहू भिंगारे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर संजू परब, मनोज नाईक, संदिप गावडे, पंढरी राऊळ, संतोष नार्वेकर, वामन नार्वेकर उपस्थित होते.
Sindhudurg: ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन सरसकट पंचनामे करा - पालकमंत्री रवींद्र चव्हाण
By अनंत खं.जाधव | Published: April 11, 2023 12:58 PM