सिंधुदुर्गनगरी : प्रशासनात लोकाभिमुख सेवा देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे. जनतेला शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा विहित वेळेत, पारदर्शक व उपयुक्त असल्याने येणाऱ्या काळाची पावले ओळखून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचे उत्तरदायीत्व जास्तीत जास्त वाढवले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी केले.जिल्हा नियोजन समिती सभागृहात नागरी सेवा दिनानिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, जिल्हा पुरवठा अधिकारी धनाजी तोरस्कर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ई. रवींद्रन म्हणाले, प्रशासनात आल्यानंतर जनतेच्या प्रत्येक प्रश्नांशी सामाजिक बांधीलकी असणे गरजेची आहे. सेवा हमी कायदा झाल्यास अधिकाऱ्यांना जास्तच जबाबदारीने काम करावे लागेल. काळाची गरज लक्षात घेता प्रत्येक विभागाला किंबहुना अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या प्रत्येक कामासाठीचा वेळ हा ठरवून त्या कालावधीत काम पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. सेवा हमी कायद्यातील तरतुदींची सविस्तर माहिती रवींद्रन यांनी यावेळी दिली.जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर म्हणाले, प्रशासकीय नोकरी मिळेपर्यंत प्रशासनात येणे हे बऱ्याचजणांचे ध्येय असते. मात्र, नोकरीत आल्यानंतर आपल्या कर्तव्याचा विसर न पडू देता उत्कृष्टपणे काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे नेहमी उत्कृष्ट ठरतात. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे म्हणाले, प्रशासकीय कामात आपले सामाजिक दायित्व मोठे असते. त्याचा विसर पडता कामा नये. लोकशाहीत लोकांच्या मताला अधिक महत्त्व असते. जनतेचे प्रश्न आणि जनतेची कामे करण्यासाठी आपण सर्व लोकसेवक आहोत. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा होणारा गौरव हा नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.सुनील रेडकर यांनी, संपूर्ण स्वच्छता अभियानात जिल्ह्यात झालेले काम आणि उर्वरित कामासाठी सर्व विभागांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच संपूर्ण जिल्हा निर्मल होण्यासाठी २०१७ पर्यंतचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, जिल्ह्यात सहा हजार कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय आल्यास संपूर्ण जिल्हा निर्मल होणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त स्वच्छ भारत मिशनचे ध्येय असल्याचे मत रेडकर यांनी व्यक्त केले.जिल्हा कृषी उपसंचालक टी. बी. पावडे यांनी, जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली. जलयुक्त शिवार अभियान ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्राच्या शेतीला शाश्वततेकडे नेणारी ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येकाला जलसाक्षरही करेल. या योजनेंतर्गतची कामे लोकांच्या गरजेनुसार करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे आता हे अभियान केवळ शासकीय योजना न राहता लोकचळवळ होत आहे. हे अभियान लोकचळवळ होत असताना होणारी कामे ही गुणवत्तापूर्ण, दर्जेदार असावीत, जेणेकरून लोकांना ती दीर्घकाळ पुरतील, यासाठीही शासन जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करतानाच गुणवत्तापूर्ण कामे करण्यासाठी शासनाने काटेकोर उपाययोजनाही केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५ गावांची या अभियानांतर्गत निवड केली आहे.उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार वनिता पाटील, नायब तहसीलदार नंदकिशोर नाटेकर, ए. एच. देवूलकर, एस. एस. खरात, एस. एस. जाधव, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक, वाहनचालक, शिपाई, कोतवाल यांचा सत्कार केला. वेंगुर्ले गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर, मालवण गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, देवगड गटविकास अधिकारी विजय चव्हाण, परुळेबाजारचे ग्रामसेवक मंगेश नाईक यांचाही सत्कार केला. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी, तर राजश्री सामंत यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा पुरवठा अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)ँप्रशासनात सामाजिक बांधीलकी हवीप्रशासनात आल्यानंतर जनतेच्या प्रत्येक प्रश्नांशी सामाजिक बांधीलकी असणे गरजेचे आहे. आगामी काळात सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी झाल्यास अधिकाऱ्यांना जास्तच जबाबदारीने काम करावे लागणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या कालावधीत काम पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.
प्रशासनात लोकाभिमुख सेवेसाठी प्रयत्न करा
By admin | Published: April 22, 2015 12:20 AM