मिठबाव : देवगड तालुक्यातील मिठबांव येथे भाजप तालुका कार्यकारिणी सदस्य तथा भाजपच्या पंचायत समिती सदस्या संजीवनी बांबुळकर यांचे पती संजय बांबुळकर यांची गाडी जाळण्याचा अज्ञाताकडून प्रयत्न करण्यात आला. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वैमनस्यातून आपल्या घातपाताचा हा कट असल्याचा आरोप संजय बांबुळकर यांनी केला.याबाबत घडलेली घटना अशी की, शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान या वाहनातून भाजप तालुका कार्यकारिणी सदस्य संजय बांबुळकर, भाजप देवगड तालुका सरचिटणीस श्याम कदम, सुनील पारकर, आदी मिठबांव पेडणेकरवाडी ते हिंदळे वरचीवाडी आणि वरचीवाडी येथून मिठबांव राणेवाडी येथे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी सुनील राणे यांच्या घरी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान आले होते. रात्री साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आणलेल्या वाहनाजवळून आवाज आल्याने नजीकच्या घरातील संतोष राणे यांनी त्याची कल्पना सुनील राणे यांच्या घरी असलेल्या संजय बांबुळकर व इतरांना दिली. घटनास्थळी सर्वजण आले असता वाहनाच्या पुढील चाकाच्या टायरमधून धूर येताना दिसला. स्थानिकांच्या मदतीने टायरवर पाणी मारण्यात आले. रात्रीची वेळ असल्याने या घटनेचे गांभीर्य निदर्शनास आले नाही. सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता वाहनाजवळ पेट्रोलची बाटली, गुटख्याची जळालेली पाकिटे दिसली. मेकॅनिकने येऊन पाहिले असता कोणताही तांत्रिक दोष आढळून आला नाही. तसेच वाहनाजवळील मातीला पेट्रोलचा वास येत होता. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. घटनास्थळी देवगड पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, हेडकॉन्स्टेबल मधुकर पानसरे, शैलेंद्र काकडे, प्रशांत जाधव, सुप्रिया भागवत, मिलिंद परब, विक्रम काकडे यांनी भेट देऊन संबंधितांचे जबाब नोंदवून पंचनामा केला. तसेच अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावेळी सरपंच जयकुमार नारिंग्रेकर, पोलिस पाटील जयवंत मिठबावकर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पारकर, सुधीर पारकर, सुनील राणे, आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षकांकडे सरपंचांची नाराजीमिठबांव येथे यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या असून, आतापर्यंत एकाही घटनेचा पोलिसांना शोध लावता आला नाही ही शोकांतिका आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पोलिस ठाणे पडल्याच्या घटनेला अनेक महिने उलटल्यानंतरही पोलिस ठाणे पुन्हा सुरू न झाल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याबद्दल सरपंच जयकुमार नारिंग्रेकर यांनी देवगड पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
मिठबांवात गाडी जाळण्याचा प्रयत्न
By admin | Published: January 15, 2017 1:03 AM