सिंधुदुर्गनगरी : राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांकडून सेल्फी काढताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता सिंधुदुर्गातील धोकादायक पर्यटन स्थळांवर अशी दुर्घटना होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पुढाकार घेऊन धोकादायक पर्यटन स्थळे निश्चित करण्याच्या सूचना तहसीलदार, गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांना दिली आहे.
सेल्फी काढण्यासाठी धोकादायक असलेल्या ठिकाणी पर्यटकांना रोखण्यासाठी स्वयंसेवक किंवा टुरिस्ट पोलीस यांची नेमणूक करावी अशी सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांना दिली आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २00५ कलम (३0) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष उदय चौधरी यांनी विविध पर्यटनस्थळी पर्यटकांमध्ये सेल्फी काढताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण विचारात घेता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सेल्फी काढण्यातून होणाऱ्या अपघातास प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने विभागनिहाय त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत सेल्फी काढताना अपघातग्रस्त होण्याची शक्यता असलेल्या प्रत्येक तालुक्यातील पर्यटन स्थळांची यादी निश्चित करावी, ती यादी पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना उपलब्ध करुन देण्यात यावी.
ही कार्यवाही तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांनी संयुक्तरित्या करावी. सेल्फी काढण्यासाठी धोकादायक असलेल्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक उभारणे याबाबत सार्वजनिक बांधकाम कणकवलीचे कार्यकारी अभियंता व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी कार्यवाही करावी.
सेल्फी काढण्यासाठी धोकादायक असलेल्या ठिकाणी पर्यटकांना रोखण्यासाठी स्वयंसेवक किंवा टुरिस्ट पोलीस यांची नेमणूक करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी कार्यवाही करावी. सेल्फी काढण्यास अति धोकादायक असलेल्या ठिकाणी कृत्रिम अडथळे उभारण्याबाबत पोलीस विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी उपाययोजना करावी. या सूचना केल्या आहेत.