शिरीष नाईक-कसई दोडामार्ग तिलारी धरणाचे पाणी मणेरी नदीतून उपसा करून वेंगुर्ले येथे नेणाऱ्या ३५० कोटी रुपये मंंजूर असलेल्या जलवाहिनीचे काम पुन्हा युद्धपातळीवर सुरु झाले आहे. हे काम अनेक राजकीय नेत्यांनी थांबवले होते.दोडामार्ग ते बांदा या राज्यमार्गावर रस्त्याच्या कडेला चर मारून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. मात्र, काम दर्जेदार होत नसल्यामुळे रस्त्याच्या बाजूपट्टीला तडे जात असल्याची व अन्य कारणे पुढे करून काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी जलवाहिनीचे काम अडविले होते. मात्र, बांधकाम व प्रकल्प अधिकाऱ्यांनी एकाही आश्वासनाची पूर्तता न करता काम पुन्हा युद्धपातळीवर सुरू केले. मणेरी येथून बांदा ते वेेंगुर्ले अशी जलवाहिनी राज्यमार्गावरून टाकण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला भला मोठा चर मारून त्यामध्ये वाहिनी टाकून वर साधी माती टाकण्यात येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर चर पडून वाहतुकीस धोकादायक बनत आहे. हे काम महिनाभर सुरू आहे.
जलवाहिनीचे काम सुरू असताना कामात अडथळे नको म्हणून काहींना हाताशी धरले होते. त्यामुळे काम सुरळीत सुरू होते. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा हे काम बंद पाडण्यात आले. काम दर्जेदार होत नाही, बाजूपट्टी कापल्याने रस्त्याला तडे गेले, खड्डे बुजविण्यासाठी साध्या मातीचा भराव टाकल्याने पावसाळ्यात माती वाहून जाऊन अपघात होण्याची शक्यता आदी कारणे पुढे करून काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी काम बंद करून कामाची पाहणी केली. यावेळी सर्व संंबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होेते. उपस्थित बांधकाम उपअभियंता पी. जी. पाटील यांना धारेवर धरले होते. यावेळी पाटील यांनी रस्त्याच्या कडेने पाईप टाकण्यास परवानगी दिली नाही, असे सांगून संबंधित प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार तसेच रस्त्याची बाजूपट्टी त्वरित दुरुस्त करणार, असे आश्वासन दिले होते. मात्र, लेखी आश्वासन देण्याची मागणी करून अधिकाऱ्यांची बैठक लावा, तोपर्यंत काम सुरू करू नये, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर पाटील यांनी काम बंद करण्याचे लेखी पत्र प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे पंधरा दिवस हे काम ठप्प होते. मधल्या काळात अनेक घडामोडी घडल्या. बैठका झाल्या आणि चार दिवसांपूर्वी काम युद्धपातळीवर पुन्हा सुरू करण्यात आले. आंदोलनावेळी उपस्थित के लेल्या एकाही मुद्याचे पालन केलेले नाही. बाजूपट्टीची दुरुस्ती केलेली नाही. तसे स्पष्टीकरणही कोणी दिले नाही. आणि अचानक काम सुरू झाल्याने ग्रामस्थ संभ्रमात पडले आहेत. काम सुरू झाल्यावर कोणताही नेता फिरकला नाही. सर्वांनीच पाठ फिरवली. याबाबत संबंधित आंदोलनकर्त्यांना विचारले असता त्यांनी बांधकाम विभागाने प्रकल्प अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिल्याने काम सुरू झाल्याची उडवाउडवीची उत्तरे दिली. दोडामार्ग ते बांदा हा राज्यमार्ग आहे. जलवाहिनीच्या कामात रस्त्याच्या कडेला चर मारून वर साधी माती ओढल्याने पावसाळ्यात रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनणार आहे. पाणी मुरतेय? गॅसवाहिनी, मायनिंग प्रकल्प आणि आता तिसऱ्या जलवाहिनी प्रकल्पांना राजकीय नेत्यांनीच प्रथम प्रखर विरोध केला. परंतु नंतर तिन्हीही प्रकल्प सुरू झाले. येथे काही पाणी मुरत आहे की लोकांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे?, शेतकऱ्यांना वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.