कुडाळ : तब्बल बारा बकऱ्यांचा तडफडून अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील गोठोस येथे ही घटना घडली. तीन बकरे आणि नऊ मादी जातीच्या बकऱ्यांचा यात समावेश आहे. या घटनेत सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने धनगर बांधवांना धक्का बसला आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाने पंचनामा केला आहे.याबाबत माहिती अशी की, माणगाव खोऱ्यातील निळेली येथील रहिवासी असलेले पंढरी बाबू येडगे यांच्या मालकीच्या या बकऱ्या आहेत. येडगे यांनी या बकऱ्या नेहमीप्रमाणे चरावयास सोडल्या. लेणीपासून नजीकच असलेल्या गोठोस येथील माळरानावरील बागेजवळ बकऱ्या चरत होत्या. त्यांचे पोट भरल्यावर त्या नजीकच असलेल्या तळीवर पाणी पिण्यासाठी उतरल्या.
पाणी प्यायल्यावर अचानक एक-दोन बकऱ्या तडफडू लागल्या आणि जाग्यावरच लोळण घेत पडल्या. हा प्रकार बघून मालकालाही काही समजले नाही त्याने धावाधाव केली. मात्र, अन्य बकऱ्याही तशा तडफडू लागल्या एक-दोन नव्हे तर बारा बकऱ्या जागीच गतप्राण झाल्याने खळबळ उडाली. मालकाच्या डोळ्यासमोर हा प्रकार झाल्याने गोठोस येथील धनगर बांधवांना धक्काच बसला. त्याने ग्रामस्थांना माहिती दिली. पंढरी येडगे यांचे मोठे नुकसान झाले आहे.विषारी औषध प्राशनाने मृत्यू झाल्याचा अंदाजगोठोस परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी आले. याबाबत तत्काळ पशुसंवर्धन विभागालाही कळविण्यात आले. पशु अधिकारी निकम यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, या परिसरात वन्यप्राण्यांचा त्रास अधिक असल्याने शेती-बागायतीचे नुकसान होते. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी विषारी औषध फवारणी केली जाते. त्याचे प्राशन या बकऱ्यानी केले असावे व त्यातच त्यांचा मृत्यू आला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.