मालवण : शहरातील भंडारी हायस्कूल मार्गावर घडलेल्या मोबाईल चोरीप्रकरणाचा सिंधुदुर्ग पोलिसांनी अवघ्या २० दिवसांत छडा लावला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन संशयितांना मोबाईल लोकेशनच्या आधारे दिवा (ठाणे) येथून रविवारी ताब्यात घेत अटक केली. दोन्ही संशयित मालवण येथील मत्स्य व्यवसायिकाकडे कामाला आले होते.दरम्यान, संशयित आरोपी अभिषेक उदय दवणे (१९), रोहित भास्कर आदमाने (२०, दोन्ही रा. नवी मुंबई) यांना अटक करून मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संशयिताना सोमवारी मालवण न्यायालयात हजर केले असता ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती तपासिक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.मालवण शहरातील भंडारी हायस्कूल मार्गावर १६ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री भरवस्तीत असलेल्या गणेश अशोक पाटील यांच्या मालकीची आर.एस. कम्युनिकेशन ही मोबाईल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी दुकानातील महागडे मोबाईल, इतर सामानासह रोख रक्कम असा एकूण ७४ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
मालवण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. भरवस्तीत घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली होती.याप्रकरणी मालवण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील व स्थानिक गुन्हे अन्वेषण (सिंधुदुर्ग पोलीस) अधिक तपास करत होते. मोबाईल लोकेशनच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अभिषेक व रोहित यांना दिवा येथून ताब्यात घेतले. तर अजून एक संशयित अद्याप फरार आहे.नवी मुंबईतून अभिषेक, रोहित आणि सोनू नामक युवक असे तिघे संशयित मालवण येथील एका मत्स्य व्यवसायिकाकडे चोरीच्या घटनेपूर्वी आठ दिवस अगोदर कामाला आले होते. त्यांनी याच दरम्यान मोबाईल शॉपीची रेकी करून चोरीचा प्लान आखला. त्यानंतर त्यांनी भरवस्तीत यशस्वी चोरी करून पसार झाले.
याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोबाईल लोकेशनच्या आधारे दोन संशयितांना दिवा (ठाणे) येथून ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.पत्नीची आत्महत्या; पतीला कोठडीसावंतवाडी : पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रविवारी सायंकाळी अटक करण्यात आलेल्या शंकर विलास तारी याला येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.सावंतवाडी-माठेवाडा येथील हेमांगी तारी या विवाहितेने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर हेमांगीच्या माहेरच्या मंडळींनी रविवारी तिचा पती शंकर याच्यावर संशय व्यक्त केला होता. शंकर यानेच हेमांगीला मारहाण केली होती. त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप हेमांगीच्या वडिलांनी पोलिसांकडे केला होता. त्यानंतर पोलिसांनी शंकरवर गुन्हा दाखल करून अटकही केली होती.सोमवारी त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने शंकराला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव करीत आहेत.