बांदा : बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात गोव्यातून सावंतवाडीत दारुची वाहतूक करताना कारवाई केली. या कारवाईत ८७ हजार रुपयांच्या दारूसह २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी तुषार तुळसकर (२०, रा. सावंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दारू वाहतुकीसाठी वापरलेली कार (एमएच-०३; एस-९९१५) जप्त करण्यात आली. ही कारवाई बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा चेकपोस्टवर करण्यात आली.याबाबत बांदा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बांदा चेकपोस्टवर सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या उपस्थितीत गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू होती. शनिवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास गोव्यातून भरधाव येणारी कार तपासणीसाठी थांबविण्यात आली.
कारची तपासणी केली असता आतमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारूसाठा आढळून आला. ८७ हजार रुपयांच्या दारूसह १ लाख ६० हजार रुपयांची कार असा एकूण २ लाख ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
बेकायदा दारू वाहतुकीविरोधात तुषार तुळसकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कदम, हेमंत पेडणेकर व विजय जाधव यांनी केली. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.