कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणातील पोलीस कोठडीत असलेले संशयीत आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिगंबर देवणूरे (३४) आणि धीरज व्यंकटेश जाधव (३६, दोन्ही रा. पुणे) यांना सोमवारी पोलीस कोठडीची मूदत संपल्यानंतर कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
दरम्यान, पोलीसांच्या तपासात या संशयीतांनी नोव्हेंबरमध्ये संतोष परब यांच्या कणकवलीतील घराची रेकी केली होती अशी माहिती पुढे आली आहे. पोलीसांनीही याला दुजोरा दिला. चार दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांनी त्या दोन संशयीतांना घटनास्थळासह अन्य काही ठिकाणी नेवून तपास केला. संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्व नियोजित होता असे पोलीस तपासात आता स्पष्ट झाले आहे. ज्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला त्या हल्लेखोरांच्या चारचाकी गाडीच्या मागोमाग एका चारचाकी मधून हे दोघे संशयित आरोपीही होते.
हल्याच्या घटनेनंतर ते पसार होण्यात यशस्वी ठरले. मात्र, हल्ला करणारे पोलिसांना सापडले होते . नोव्हेंबर महिन्यामध्ये कणकवलीत येवून संतोष परब यांच्या घराची त्या दोघांनी रेकी केली होती.अशी महत्वपूर्ण माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. पुणे येथील या संशयीतांना घटनेच्या तीन महिन्यानंतर पोलीसांनी अटक केली. दरम्यानच्या कालावधीत ते गायब झाले होते. या हल्लाप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर करत आहेत. दरम्यान,या दोन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे ते आता जामीनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.