कुडाळ : महाराष्ट्र राज्य जलशिवार योजनेतून कुडाळ भंगसाळ नदीचा गाळ काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून, याठिकाणी हे काम सामाजिक संघटना एकत्र येऊन करीत आहेत. आमदार नीतेश राणे यांनी या उपक्रमस्थळी भेट देत सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या दोन दिवसात सुमारे ४०० डंपर गाळ काढण्यात आला आहे.गेली अनेक वर्षे कुडाळ भंगसाळ नदीतील गाळ काढण्यात आला नव्हता. त्यामुळे या नदीत गाळाचे डोंगर उभे झाले आहेत. परिणामी नदीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे येथील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत भविष्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी लोकसहभागातून गाळ काढण्याचे ठरविले.या उपक्रमाला राज्य शासनानेही मान्यता दिली. त्यामुळे हा गाळ राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून काढला जात आहे. दरम्यान, या उपक्रमस्थळी जात आमदार नीतेश राणे यांनी पाहणी केली. तसेच हा गाळ काढण्यासाठी एकत्र आलेल्या सर्व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष आबा धडाम तसेच कॉंग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. रणजीत देसाई यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे आमदार राणे यांनी विशेष कौतुक केले. (प्रतिनिधी)पाण्याची पातळी : लाखो लीटरने वाढणारदरम्यान, गाळ काढण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी भंगसाळ नदीच्या पात्राकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याच्या खाली नळपाणी योजनेची पाईप लाईन होती. डंपर वाहतुकीमुळे तिसऱ्या दिवशी ही पाईप लाईन फुटली. त्यामुळे डंपर वाहतूक बंद होती. गाळ असल्यामुळे या ठिकाणची पाणी पातळी कमी होत होती. मात्र, नदीपात्रातील गाळ काढल्याने येथील पाण्याची पातळी लाखो लीटरने वाढणार, हे निश्चित. मोठ्या प्रमाणात गाळया ठिकाणी गाळ काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. दोन दिवसांत सुमारे ४०० डंपर गाळ काढण्यात आला. नदीपात्रातील गाळ अनेक वर्षांपासून असल्याने तो मोठ्या प्रमाणात साचला आहे. हा गाळ काढण्यासाठी १५ ते २० दिवस लागतील, असे सद्यस्थितीवरून दिसून येते.
दोन दिवसांत चारशे डंपर गाळ काढला
By admin | Published: May 14, 2016 11:38 PM