सिंधुदुर्ग : गणपती विसर्जनाच्या वेळी मालवण तालुक्यातील आचरा समुद्र किनारी गणपती विसर्जनासाठी गेलेले आचरा वरची वाडी येथील दोन युवक बुडण्याची दुर्घटना गुरुवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.
आपले गणपती समुद्रात सोडण्यासाठी गेलेले लाईफटाईम हाॅस्पिटलचे कर्मचारी प्रशांत तावडे आणि एसटी महामंडळाचे ड्रायव्हर संजय परब आपले गणपती विसर्जनासाठी समुद्रात गेले होते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गणपती पाण्यात सोडून परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडू लागले. जिवरक्षक रसिक जोशी यांनी जिवाची बाजी लावून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याने प्रयत्न फोल ठरले. यावेळी सकलेन मुजावर, दिलिप पराडकर,पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी यांनी ही प्रयत्न केले. मात्र प्रयत्न निष्फळ ठरले. सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय धेंडे, कांबळे , महिला पोलीस मलमे यांच्यासह आचरा ग्रामस्थांनीउशिरापर्यंत शोध मोहीम सुरू ठेवली होती.