माणगाव : माणगाव खोऱ्यातील पकडण्यात आलेल्या रानटी हत्तींना प्रशिक्षित करण्यासाठी किमान दोन महिने लागणार आहेत. मात्र, या हत्तींना प्रशिक्षण देण्यासाठी याच परिसरातील माहूताला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याच्या प्रशिक्षणासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल. तसेच हत्तीला कायम काम हवे, अन्यथा तो आक्रमक होऊन निरुपयोगी ठरतो, असे मत बेळगाव येथील हत्तीतज्ज्ञ डॉ. अजय देसाई यांनी व्यक्त केले. यावेळी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एस. के. राव यांनी आंबेरीतील पकडण्यात आलेल्या हत्तींची पाहणी केली. जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने हत्ती पकड मोहिम सुरु केली आहे. त्या अनुषंगाने वनविभागाने प्रसिद्ध हत्तीतज्ज्ञ हत्तीपकड मोहिमेसाठी सल्लागार म्हणून निवड केली आहे. मोहिमेपूर्वी या भागाची परिपूर्ण माहिती प्रत्यक्ष भेटीतून घेतली होती. त्यानंतर देसाई यांनी क्रॉल उभारणीबाबत आंबेरी नाका येथील जागेची पाहणी केली होती. शनिवारी आंबेरी नाका येथे क्रॉलमध्ये बंदिस्त केलेल्या रानटी हत्तींची त्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार उपस्थित होते. यावेळी देसाई म्हणाले, जवळपास तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात हत्तींचे वास्तव्य होते. पुरेसे खाद्य व वातावरणातील बदलामुळे महाराष्ट्रातून हत्ती हद्दपार झाले. सध्याच्या परिस्थिती दांडेली भाग हत्तींच्या वास्तव्यासाठी चांगला आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशाप्रकारे हत्तीपकड मोहीम वाढविणे सुरू आहे. अशाप्रकारचे क्रॉल तामिळनाडू, कर्नाटकमध्ये उभारले जातात. क्रॉलमधील हत्तींना प्रशिक्षित करण्यासाठी चांगल्या माहुताची आवश्यकता असते. माहूत चांगला असेल तर दोन महिन्यात पकडलेले जंगली हत्ती प्रशिक्षित होऊ शकतात. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. या पर्यटन जिल्ह्यात पकडलेले जंगली हत्ती प्रशिक्षित झाल्यास पर्यटनदृष्ट्या त्यांचा फायदा होऊ शकतो. पकडलेले तिन्ही हत्ती नर असल्याने भविष्यात या जंगली हत्तींना जिल्ह्यातच ठेवायचे की बाहेर पाठवायचे, हे ठरले तर, आवश्यकतेनुसार प्रजननासाठी मादीला याठिकाणी आणून हत्तींची संख्या वाढविली जाऊ शकते. (प्रतिनिधी)