सावंतवाडी : आडाळी येथून निघालेल्या लाँग मार्च ला भाजप मधील एका गटाने पाठींबा दिला तर दुसरा गट सरकारची बदनामी करणारे कृत्य योग्य नाही म्हणतो मग खरा कोणाचे मानायचे या निमित्ताने भाजप मध्ये दोन ते तीन गट असल्याचे दिसून आले अशी टिका मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, प्रकाश साटेलकर, मंदार नाईक आदी उपस्थित होते.उपरकर म्हणाले, दीपक केसरकर यांनी अशी कोणती जादूची कांडी फिरविली की कायम विरोधात बोलणारे नारायण राणे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. या मागचे नेमके गमक काय? कोणत्या मुद्दावर ते एकत्र आले की ही सर्वसामान्य मतदारांची फसवणूक आहे? जिल्ह्याच्या भाजपात दोन ते तीन गट पडले आहेत. त्यामुळे सर्वजण एकमेकाला संपवायला निघाले आहेत. याचाच परिपाक दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत पहायला मिळाला. आपलेच लोक विरोधात गेले हे राणेंना अप्रत्यक्षरित्या कबूल करावे लागले, असेही त्यांनी सांगितले.केसरकर यांनी कायम स्वार्थी राजकारण केले आहे. दहशतवादाचा मुद्दा पुढे करुन त्यांनी नेहमी आपला स्वार्थ साधला आहे. पहिले ते शिवसेनेत गेले आणि त्यानंतर त्यांनी शिंदे गटात मंत्रीपद मिळविले. या काळात सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांबाबत त्यांना कोणतेही सोयर-सुतक राहिले नाही. त्यांनी जाहीर केलेली विकासकामे, रोजगाराभिमुख प्रकल्प आणि आश्वासने पुर्ण झालेली नाहीत.राणेंवर टिका राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी दोडामार्ग तालुक्याची निर्मिती केली. त्यानंतर ते उद्योगमंत्री होते. परंतु नंतरच्या दहा वर्षात त्यांना कोणताही विकास किंवा रोजगाराचा प्रकल्प आणण्यास का जमला नाही ? याचे त्यांनी उत्तर द्यावे. फक्त सिंधुदुर्गाचा जीडीपी वाढला, असे सांगुन लोकांची दिशाभूल करू नये.आता एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले सिंधुदुर्गभाजपात आता दोन ते तीन गट पडले आहेत. जो तो एकमेकाला संपविण्यासाठी निघाला आहे. त्याचा प्रत्यय दोडामार्गमध्ये घेण्यात आलेल्या सभेच्यावेळी आला. त्या ठिकाणी एकमेकांवर टिका करणारे केसरकर, राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले, असेही ते म्हणाले.
आडाळी लाँग मार्चला पाठींबा देण्यावरून भाजपातच दोन गट, परशुराम उपरकर यांचा आरोप
By अनंत खं.जाधव | Published: August 28, 2023 6:36 PM