कणकवली : कासार्डे येथे मुुंबई- गोवा महामार्ग ठेकेदार केसीसी बिल्डकॉनच्या बेस कॅम्प २ च्या आवारात दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. याबाबत गावठी कट्टा डोक्याला लावत ठार मारण्याची धमकी देत महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार केसीसी बिल्डकॉनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची तर केसीसी बिल्डकॉनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लोखंडी शिग आणि लाकडी बांबूने जीवघेणी मारहाण केल्याची परस्परविरोधी तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही गटातील संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली असून इतर संशयितांचा शोध रात्री उशिरापर्यंत घेण्यात येत होता.याबाबत आदित्य प्रतापसिंग यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कासार्डे येथील केसीसी बिल्डकॉनच्या कॅम्पवर रिसेप्शन रूममध्ये मी व्हिडिओ कॉलिंगवर बोलत होतो. तेवढ्यातत गेट नं. १ वर संशयित आरोपी यांनी वॉचमन प्रशांत तावडे याच्याशी वाद घातला.त्यानंतर वॉचमन याने मला गेटवर सनी पाताडे व ८ ते १० जण आले आहेत असे सांगितले. त्यानंतर ते सर्व संशयित आत घुसून गाडी चालवित असताना रस्त्यावरील खड्ड्याात कार जोराने आदळली.
गुरुमित सिंग कोठे आहे? फोन लागत नाही. तुमच्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले, असे सांगितले. तेथून कामगार राहत असलेल्या कॅम्पकडे सर्वजण गेले़ त्याठिकाणी आरडाओरडा ऐकू येऊ लागला. पुन्हा सर्व संशयित आरोपी माझ्याकडे आले. तसेच मला हातातील लाकडी दांडे, लोखंडी रॉड घेऊन मारहाण करू लागले. माझ्या पायावर, डोक्यावर, तोंडावर, छातीवर ठोशाने मारहाण केली. मुका मार दिल्याने माझ्या नाकातून रक्त आले. त्यानंतर रूम नं. २ मध्ये विश्रांती घेत असलेल्या कामगारांना त्यांनी मारहाण केली व मोबाईल हिसकावून फोडून टाकले.या मारहाणीत कामगार व मी जखमी असल्याचे आदित्य प्रतापसिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे़ यावरून कणकवली पोलिसांनी ७ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये प्रेषित चंदशेखर महाडिक (२४, रा़ तळेरे), प्रथमेश उर्फ सनी रणजित पाताडे (२५, रा़ कासार्डे), शाहू विलास राठोड (२२, रा. कासार्डे, मूळ उस्मानाबाद), अजिंक्य रणजित पाताडे (२१, रा़ कासार्डे), राहुल विलास राठोड (३०, रा़ कासार्डे, मूळ उस्मानाबाद), अनिल अशोक साळकर (२८, रा़ चाफेड, देवगड), प्रणय दीपक देवरुळकर ( २४, रा. कासार्डे) यांचा समावेश आहे. प्रणय देवरुळकर वगळता अन्य ६ आरोपींना कणकवली पोलिसांनी अटक केली.संशयितांविरोधात गुन्हा दाखलप्रेषित महाडिक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या डोक्यास १२ टाके पडले असून जखमी असल्याने तक्रार देण्यास मला उशीर झाला़ केसीसी बिल्डकॉनचे अधिकारी गुरुमित सिंग, ओपाल मलिक यांच्यासह दहा ते १२ जणांनी मला मारहाण करून शिवीगाळ करीत धमकी दिल्याने त्यांच्याविरुद्ध माझी तक्रार आहे. त्यानुसार कणकवली पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणी कणकवली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत़