बांदा : गोवा बनावटीच्या दारूची सांगलीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ पथकाने डेगवेत रविवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत २२ लाख ३४ हजार चारशे रुपयांची दारू व १० लाखांचा कंटेनर असा एकूण ३२ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी सुरेश तानाजी पवार (२३) व अजित बाळसो सावंत (२८, दोघेही रा. बनाळी, ता. जत, जि. सांगली) यांच्यावर अटकेची कारवाई केली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुडाळ येथील राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला बांद्याहून दोडामार्गच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकातील कर्मचारी बांदा-दोडामार्ग मार्गावरील डेगवे येथे सापळा रचून होते.
वाहनांची कसून तपासणी सुरु होती. बांद्याहून दोडामार्गच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच १० डब्लू ७९६१) कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी थांबण्याचा इशारा केला. गाडीची तपासणी केली असता पाठीमागील हौद्यात ताडपत्रीच्या खाली दारूचे बॉक्स लपवून ठेवलेले निदर्शनास आले.यामध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे ३२० बॉक्स आढळून आले. सदरच्या दारूची किंमत २२ लाख ३४ हजार ४०० रुपये असून गाडीची किंमत १० लाख असा एकूण ३२ लाख ३४ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल उत्पादन शुल्कने ताब्यात घेतला.ही कारवाई दुय्यम निरीक्षक ए. आर. जगताप, एन. पी. रोटे. ,सी. डी. पवार, सी. एल. कदम, चालक एच. आर. वस्त, प्रसाद माळी, शिवशंकर मुपडे, यांच्यासह कुडाळ कार्यालय पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली. या विभागाचे कर्मचारी गाड्या तपासणी करताना दिसत नाहीत.
या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आर्शिवादाने राजरोसपणे दारु वाहतुक होत असते असा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळेच कुडाळ कार्यालयाच्या पथकाने यांच्या हद्दीत येऊन नाकावर टिच्चून कारवाई केली. त्यामुळे इन्सुली उत्पादन शुल्कचा सुस्त कारभार समोर आला आहे.