सिंधुदुर्गनगरी : बांदा सटमटवाडी येथे माकडतापाच्या साथीने मृत्यूमुखी पडलेल्या सात रूग्णांच्या नातेवाईकांना खास बाब म्हणून प्रत्येकी दोन लाख रूपये एवढी मदत दिली जाणार आहे. प्रथम प्रस्ताव केलेल्या सातरूग्णांचे प्रस्ताव मंजूर झाले असून लवकरच या रूग्णांच्या नातेवाईकांकडे धनादेश सुपूर्द केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के. जोशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा माहिती अधिकारी मिलींद बांदिवडेकर उपस्थित होते.पालकमंत्री केसरकर म्हणाले, बांदा सटमटवाडी परिसरात यावर्षी माकडतापाची साथ उद्भवल्यामुळे अजूनपर्यंत ९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ८० रूग्ण या साथीने बाधित आढळून आले आहेत. या मृत रूग्णांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुरूवातीला सात रूग्णांचे प्रस्ताव पाठविले होते. हे सर्वच्या सर्व प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केले असून सुरूवातीला प्रत्येकी एक लाखाची मदत जाहीर केली होती. परंतु आपण मुख्यमंत्र्यांकडे किमान दोन लाख प्रती मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळावी अशी मागणी केली. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून या सात मृत रूग्णांच्या नातेवाईकांसाठी १४ लाखाचा निधी मंजूर केला आहे. राज्यात अशा निधीची तरतूद नसल्याचेही पालकमंत्र्यांनी नमूद केले. लवकरच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखाप्रमाणे धनादेशाचे वितरण केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली. पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हा मुख्यालयाच्या विकासाविषयी चर्चा केली. ते म्हणाले, जिल्हा मुख्यालय (सिंधुदुर्गनगरी) स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणून जिल्हा मुख्यालयाचा विशेष विकास करण्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून मुख्यालयात काय सुधारणा करणे आवश्यक आहे. यासाठी एक विचारविनिमय सभा गुरूवार १३ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता मुख्यालयातील जुन्या नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत इतक्या वर्षामध्ये मुख्यालयामध्ये कोणत्या प्रकारच्या सुधारणा करणे राहून गेले आहे याबाबत नागरिकांनी सूचना द्याव्यात. ओरोस फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, सिडकोचे विश्रामगृह, स्मृतीवन, अणाव दाभाचीवाडी, पर्यटन केंद्र, टाऊन पार्क यामध्ये कोणत्या प्रकारच्या सूचना करता येतील याविषयी सूचना असाव्यात. (प्रतिनिधी)
मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख
By admin | Published: April 12, 2017 12:59 AM