अनंत जाधव, सावंतवाडी: सिंधुदुर्ग उपवनसंरक्षकाचा प्रभारी कार्यभार चिपळूण उपवनसंरक्षक दिपक खाडे यांच्याकडे देण्यात आला होता.पण ते दीर्घकालीन सुट्टीवर गेल्याने या पदाचा कार्यभार सामाजिक वनीकरण चे उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्या कडे देण्याचा आदेश शुक्रवारी येथील वनविभागला झाला तसे पत्र ही कोल्हापूर कार्यालयाकडून प्राप्त झाले. पण पहिल्या पत्राला दोन तास होतात ना होतात तोच दुसरे पत्र कार्यालयाला आले आणि या पदाचा कार्यभार सहाय्यक वनसंरक्षक वर्षाराणी खारमाटे यांच्याकडे देण्याचा आदेश दिला खरा पण अवघ्या दोन तासांत आपलाच आदेश बदलण्याची नामुष्की मुख्य वनसंरक्षकावर आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर हे 31 मे 2022 ला सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद गेल्या दिड महिन्या पासून रिक्त असून या पदाचा प्रभारी कार्यभार चिपळूण उपवनसंरक्षक दिपक खाडे याच्याकडे देण्यात आला होता. मात्र ते दोन दिवसापूर्वीच दीर्घकालीन सुट्टीवर गेल्याने या पदाचा कार्यभार सिंधुदुर्ग सामाजिक वनीकरण चे उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्या कडे देण्याचे निश्चित झाले होते.तसेच पत्र ही कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक रामनुजम याच्या सहीने सिंधुदुर्ग वनविभागाला आले त्यानंतर पुराणिक हे आपल्या पदाचा कार्यभार घेण्यासाठी येणार होते. मात्र तत्पूर्वीच रामनुजम यांचे दुसरे पत्र वनविभागाला प्राप्त झाले आणि त्यात सिंधुदुर्ग च्या सहाय्यक वनसंरक्षक वर्षाराणी खारमाटे यांच्याकडे उपवनसंरक्षक पदाचा कार्यभार देण्यात यावा असे आदेश देण्यात आले एकाच अधिकाऱ्यांने दोन तासात दोन पत्रे पाठवली मग कुठले खरे मानायचे असा प्रश्न येथील कार्यालयाला पडला खरा अखेर दुसरे पाठविण्यात आलेले पत्र ग्राह्य मानत खारमाटे यांच्याकडेच पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला.
या निमित्ताने वनविभागात असलेला सावळागोंधळ उघड झाला असून आपलेच आदेश बदलण्याची नामुष्की मुख्यवनसंरक्षकाना आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक पद हे गेले दिड महिना रिक्त आहे.आरएफएस दर्जाचे हे पदावर व्यक्ती नसतना ही शासनाने कोणताच निर्णय घेतला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून सिंधुदुर्ग वनविभागच वाऱ्यावर सोडला सारखा आहे.कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपवनसंरक्षक पदाबरोबरच सहाय्यक वनसंरक्षक ही पदे ही गेले अनेक महिने रिक्त होते.पण दोन दिवसापूर्वीच एक सहाय्यक वनसंरक्षक हजर झाले पण अद्याप दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्तच आहेत.