वैभव साळकर - दोडामार्ग दोडामार्ग आणि साटेली- भेडशी या तालुक्यातील दोनच मोठ्या बाजारपेठा आहेत. तालुक्यातील जनतेचा बाजारहाट याच दोन्ही बाजारपेठांतून होतो. शनिवार आणि रविवार हे या दोन्ही बाजारपेठांच्या आठवडा बाजारांचे दिवस. मात्र, दोन्ही आठवडा बाजारासाठी ग्रामपंचायतींनी आवश्यक ते ‘मार्केट’ उभे न केल्याने आठवडा बाजारादिवशी परगावाहून येणारे व्यापारी मुख्य राज्यमार्गावरच आपले ‘बस्तान’ मांडतात. यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असल्याचेच चित्र पहावयास मिळते. या राज्यमार्गाचा वापर करण्याचा ज्या वाहनचालकांचा हक्क आहे, त्यांना मात्र बाजारादिवशी जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागतात. शिवाय मार्केटअभावी भाजी विके्रत्यांचा तर मोठा धिंगाणा असतो. बाजार संपला की टाकाऊ भाजी आणि भाजीचे करंडे दोन्ही बाजारपेठातील हमरस्त्यावरच टाकून ते काढता पाय घेतात. त्यामुळे मग नागरिकांना दुर्गंधी आणि त्यापासून उद्भवणाऱ्या ‘जर्जर’ आजारांना तोंड द्यावे लागते. तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा साटेली-भेडशी आणि दोडामार्ग या दोन्ही बाजारपेठेतील समस्या तेथील ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी यांनी निकालात काढणे नागरिकांच्या हिताचे ठरेल. दोडामार्ग तालुक्यातील तालुका ठिकाणचा दोडामार्ग आणि पूर्वकाळापासूनची साटेली- भेडशी या दोन्ही बाजारपेठा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दोन्ही बाजारपेठात शनिवार व रविवारी आठवडा बाजार भरतो. गेल्या अनेक वर्षांपासून या बाजारपेठांचा आठवडा बाजार भरत असतानाही ‘मार्केट’चा प्रश्न मात्र मार्गी लागलेला नाही. समस्यांवर मात करत नागरिकांना शेवटी ‘बाजारहाट’ करावीच लागते. पिंपळेश्वर देवस्थान(गांधी चौक) येथून दोडामार्गची बाजारपेठ चारही बाजूंनी विस्तारली आहे. तिलारी-गोवा, बांदा-आयी गांधी चौकातून चारही दिशांनी जाणाऱ्या हमरस्त्यांवर बाजारपेठ विस्तारली आहे खरी, मात्र दोडामार्गचा आठवडा बाजार हा आयी व तिलारी मार्गाच्या दुतर्फाच भरला जातो. दोडामार्गात रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारदिवशी मार्गावरून वाहने हाकणे आणि वाहने पार्क करणे यासाठी वाहनचालकांच्या नाकी दम येतात. कारण एरवी दरदिवशी दोडामार्ग गांधीचौक ते तिलारी रोडवर पंचायत समिती कार्यालयापर्यंत राज्यमार्गावर मोकळ्या जागेत मालवाहतूक, एस.टी. गाड्या आणि प्रवाशी वाहतूक करणारी सर्व वाहने तीन व सहा आसनी रिक्षा उभ्या असतात. मात्र, बाजारदिवशी जागाच नसल्याने त्या सर्वांना तेथून वाहने मिळेल त्या जागेत पार्क करावी लागतात. वाहनांची जागा व्यापारी बळकावतात. शेवटी नागरिकांनाच मिळेल तशी वाट काढत ‘बाजार’ करावा लागतो. साटेली-भेडशीतील स्थिती तर दोडामार्गपेक्षा बिकट आहे. तालुक्यातील एकूण ५९ गावांपैकी ३0 ते ३५ गावांचा बाजार याच बाजारपेठेतून होतो. सर्वांत जुनी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या या बाजारपेठेची अवस्थाही आजघडीलाही पूर्वीसारखीच आहे. नियमित बाजारपेठेच्या रंगढंगात जरी बदल झाला असला तरी आठवडा बाजार पूर्वीच्या ढंगात भरतो. वरचा बाजार चर्च ते खालचा बाजार दामोदर सभागृह अशी साटेली- भेडशी असा विस्तारला आहे. मात्र, दोडामार्ग- तिलारी राज्यमार्गाच्या दुतर्फाच ही बाजारपेठ आहे. आठवडा बाजारासाठी दोडामार्गप्रमाणे साटेली-भेडशीतही स्वतंत्र बाजारपेठेची व्यवस्था नाही. परिणामी साटेली-भेडशीतही बाजारादिनी येणाऱ्या व्यावसायिक राज्यमार्गाच्या दुतर्फाच आपले बस्तान मांडतात. बाजारपेठांबाबत नाराजीबाजारात नागरिक आणि वाहनचालक यांना मोठी कसरत करावी लागते, तर व्यापारीही या कसरतीतून सुटलेले नाहीत. साटेली-भेडशी बाजारपेठेत रस्त्यांच्या गटारांअभावी पावसाचे बाजारपेठ आणि रस्त्यावर घुसणारे पाणी त्यांना नाकीदम आणते. नागरिकांना तर नाक मुरडत बाजार करावा लागतो. या ‘यातनामय’ प्रवासामुळे नागरिकांतून दोन्ही बाजारपेठांबाबत तीव्र नाराजी आहे.
दोन बाजारपेठा भररस्त्यावर
By admin | Published: March 12, 2015 9:24 PM