बांदा : बांदा सटमटवाडीतील माकडतापाची साथ कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. माकडतापाचे आणखी दोन रुग्ण शुक्रवारी पॉझिटिव्ह आले आहेत. माकडताप बाधित रुग्णांची संख्या आता ४६ वर पोहोचली असून, तापाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. आरोग्य, वन व पशुधनची मोठी टीम गावात कार्यरत असली तरीही त्यांचे काम केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेले दोन्ही रुग्ण वयस्कर असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.बांदा परिसरावर माकडतापाचा विळखा दिवसेंदिवस आणखीनच घट्ट होत चालला आहे. आतापर्यंत १०८ रुग्णांचे रक्ताचे नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पैकी ४६ रुग्णांना माकडतापाची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर पशू, वन व आरोग्य विभागाची अतिरिक्त टीम बांद्यात दाखल झाली खरी. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाहीची वाणवा आहे. केवळ कागदोपत्री अहवाल सादर करण्याचा त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. माकडताप बाधित तसेच माकडतापाने मृत पावलेल्या रुग्णांच्या घराभोवती फवारणी करण्याची मागणी करूनही अद्याप तशी फवारणी करण्यात आलेली नाही. यावरूनच तिन्ही विभागाच्या कार्याची पावती मिळते.बांदा सटमटवाडीत आॅक्टोबरपासून तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने जिल्हा हिवताप विभागाने परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी पाहणी दरम्यान एका कॉटनवर तब्बल ५० ते ६० हजार गोचीड आढळून आले होते. त्याचवेळी संबंधित विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कार्यवाही करणे गरजेचे होते. मात्र, कागदोपत्री काम करणाऱ्या संबंधित हिवताप विभागाने याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळेच या समस्येने उग्र रूप धारण केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. डिसेंबरअखेरीस माकडतापाचा पहिला रुग्ण सापडला. याकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधूनही दुर्लक्षच करण्यात आले.सध्या वन व पशुधन विभागाची मोठी टीम सटमटवाडी परिसरात आहे. ग्रामस्थांना अपेक्षित काम होताना मात्र दिसत नाही. परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे काम संथगतीने सुरू आहे. माकडताप बाधित रुग्णांच्या घराच्या सभोवतीही अद्याप फवारणी करण्यात आलेली नाही. तीनही विभाग अपेक्षित काम करीत नसल्यामुळे साथ आटोक्यात येण्यास विलंब होत असल्याचाही ग्रामस्थांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)
माकडतापाचे आणखी दोन रुग्ण
By admin | Published: March 10, 2017 11:14 PM