बांदा : बांदा-सटमटवाडी परिसरात माकडतापाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, दोन रुग्ण नव्याने सापडले आहेत. आतापर्यंत बांदा येथे माकडतापाने बाधित रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. सटमटवाडी ग्रामस्थांच्या आक्रमकतेनंतर जिल्हा आरोग्य यंत्रणादेखील कामाला लागली असून, सोमवारी जिल्ह्यातील पाच डॉक्टरांचे विशेष पथक सटमटवाडी येथे येऊन रुग्णांची तपासणी करीत होते. हे पथक पुढे २१ दिवस याठिकाणी कार्यरत राहणार आहे. सोमवारीही सटमटवाडी येथे सूर्यकांत मंगेश शिरोडकर यांच्या काजूच्या बागेत दोन माकडे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. माकडतापाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काजू बागेत जाताना डीएमपी आॅईल अंगाला लावूनच जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. केएडी व्हायरसमुळे माकडे मृत होऊन त्यांच्या अंगावरील दूषित गोचीड मानवी वस्तीत, तसेच पाळीव जनावरांद्वारे येत असल्याने या परिसरात माकडतापाने थैमान घातले आहे. गेल्याच आठवड्यात एकाच दिवशी दोघांचा बळी गेल्याने नागरिकांनी माकडतापाची धास्ती घेतली आहे. सोमवारी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सटमटवाडी येथील उमा उत्तम शिरोडकर व मंदार लुमा चौकुळकर हे दोन रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यामुळे माकडतापानेग्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या ही ३९ वर पोहोचली आहे. तर सटमटवाडी येथील रुग्णांची संख्या ही २७ वर पोहोचली आहे. यातील तिघा रुग्णांवर गोवा-बांबोळी येथे उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती स्थिर असून, एका रुग्णावर गोवा येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.रुग्णांची संख्या ही वाढतच असल्याने व रुग्णांना उपचारासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने बांधकाम सुरू असलेल्या नूतन इमारतीतील एक कक्ष या रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. सटमटवाडी येथे सापडलेल्या मृत माकडांची बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर, वनरक्षक आत्माराम सावंत व रमेश पाटील यांनी विल्हेवाट लावली. डिंगणे, गाळेल, डोंगरपाल व डेगवे येथेही मृत माकडे सापडत आहेत. सटमटवाडी ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक रमेशकुमार यांना रविवारी घेराओ घालून याठिकाणी अतिरिक्त कर्मचारी देण्याची मागणी केली होती. ती मागणी मान्यदेखील करण्यात आली होती. मात्र, बांदा वनविभाग कार्यालयात केवळ तीनच कर्मचारी कार्यरत असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
माकडतापाचे आणखी दोन रुग्ण
By admin | Published: March 06, 2017 11:45 PM