कणकवली (सिंधुदुर्ग) : आमच्या शिवसेनेच्या घराणेशाहीवर अमित शाह बोलत आहेत. मला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरून मते मागत आहे. मोदी, शाह यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आपल्या वडिलांचे नाव वापरून मते मागावित. भाजप हा बेअकली पक्ष आहे. मोदी-शहा यांनी मागील १० वर्षांत देश लुटला आहे. सुरतचे दोघेजण महाराष्ट्र लुटत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीचे सरकार आल्यास मोदी-शहा यांनी लुटलेले सर्व वसूल केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार मिलिंद नार्वेकर, ॲड. अनिल परब, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, सतीश सावंत, अतुल रावराणे, प्रदीप बोरकर, उपनेते गौरीशंकर खोत, जान्हवी सावंत, कमलताई परुळेकर आदी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणातून धनुष्यबाणाला नाहीसे केलेउद्धव ठाकरे म्हणाले, सिंधुदुर्गसह कोकणाशी शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे नाते जुळलेले आहे. तुमच्या हृदयातून शिवसेना काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? एकीकडे आमचे चिन्ह चोरले, पक्ष चोरला आणि आता कोकणातून धनुष्यबाणाला नाहीसे करण्याचा कट रचण्यात आला. त्यामुळे निवडणुकीत मशालीची धग भाजपला दाखवून द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
आकसाचा सूड घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीमोदी, अमित शाह यांनी आपल्या सभांमध्ये बाळासाहेब नव्हे तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असा आदरार्थी त्यांच्या नावाचा उल्लेख करावा, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. अमित शहा तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही. महाराष्ट्राच्या विरोधात जाल, तर याद राखा. तुम्ही करीत असलेल्या आकसाचा सूड घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
पुन्हा २ खासदार होऊ शकतातगुजरातच्या विरोधात मी नाही. त्यांच्या हक्काचे जे आहे ते त्यांना देऊ, पण महाराष्ट्र ओरबाडू देणार नाही. चिपी विमानतळ आता चालू आहे की बंद आहे? आम्ही मागे लागून सुरू केला, आता काय ? मोदी, शाह आमचे प्रकल्प पळवलात. मुंबईचे वित्तीय केंद्र गुजरातला नेले ते परत आणले जाईल. पूर्वी २ खासदार असलेल्या भाजपचे ३०० खासदार झाले. पण त्याचे पुन्हा २ खासदार होऊ शकतात. हे त्यांनी लक्षात घ्यावे.
बारसूत रिफायनरी होणार नाही जाहीर करून दाखवाकोकणाला उद्ध्वस्त करणारी नाणार नंतर आता बारसूत होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. परंतु मी ही रिफायनरी होऊ देणार नाही. माझे गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान आहे की तुम्ही बारसूत रिफायनरी होणार नाही, असे जाहीर करून दाखवावे. जसे मी ठामपणे बोलतो तसे तुम्ही बाेलून दाखवा, असे प्रतिआव्हान दिले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.