आरोंदा : मळेवाड कोंडुरा येथून गोव्याच्या दिशेने चिरे वाहतूक करणाऱ्या कॅँटरने साटेली कासववाडी येथील वळणावर दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत दोघे तरुण जागीच ठार झाले. यात शांताराम रमेश पांढरे (वय २६, रा. आजगाव, ता. सावंतवाडी) तर दुसरा मृत मोहन पठाडे (२५, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. दुसऱ्या दुचाकीवरील एक युवक गंभीर जखमी झाला आहे. कँटरच्या धडकेनंतर चिरे अंगावर पडल्याने ते दोघे युवक जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर गोव्यातील कँटर चालक फरार झाला असून, साटेलीसह वेंगुर्लेतील ग्रामस्थ आक्रमक होत जोपर्यंत कॅँटर चालकाला हजर करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. मळेवाड कोंडुरा येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चिरे वाहतूक करणाऱ्या कँटर (जीए ०१ झेड २४४९) साटेली येथील कासववाडी वळणावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटले. कँटर गोव्याहून वेंगुर्लेच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीवर आदळला. या अपघातात दुचाकीस्वार नीतेश सावंत (२२, रा. वेंगुर्ले) हा जखमी झाला. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान, या अपघातानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना कँटर रस्त्याच्या कडेला गेला आणि या दुसऱ्या दुचाकीस्वाराच्या अंगावर कोसळला आहे. हे युवक (जीए ०६-०८२६) या दुचाकीने गोव्याहून आजगावच्या दिशेने जात होते. यात शांताराम पांढरे व त्याचा मित्र मोहन पठाडे यांचा समावेश होता. अपघातानंतर या दोन्ही तरुणांच्या अंगावर चिऱ्याने भरलेला कँटर कोसळला. त्यामुळे ते तरुण जागीच मृत पावले. जादा पोलीस कुमक मागवली अपघातानंतर कँटरचालक फरार झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. घटनास्थळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने वाढत असल्याचे बघून पोलिसांनी साटेली येथील जादा पोलीस कुमक मागवली. उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्याबाबत पोलीस मृतांच्या नातेवाइकांना विनंती करीत होते. चिरे खाणीवर बंदी; मग वाहतूक कशी अपघातग्रस्त कॅँटरमध्ये चिरे होते. मात्र, मळेवाड कोंडुरा तसेच सातार्डा भागात चिरेखाणीवर बंदी आहे, मग ही चिरे वाहतूक कशी सुरू, असा सवाल ग्रामस्थ पोलिसांना करीत होते. पण हा विषय महसूल विभागाशी संबंधित असल्याचे सांगत पोलीस त्यावर बोलणे टाळत होते.
कॅँटरच्या धडकेत दोन तरुण ठार
By admin | Published: April 06, 2015 1:29 AM