कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावर जानवली-साकेडी तिठा येथे बॉक्सवेल व्हावा. अशी जानवली ग्रामस्थांची मागणी आहे. त्याअनुषगाने जानवली - साकेडी फाट्या जवळ अगोदर जाहीर केल्याप्रमाणे लाक्षणिक उपोषण मंगळवारी करण्यात आले.साकेडी तिठा येथे बॉक्सवेल होण्यासाठी यापूर्वी जानवली ग्रामस्थांनी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. मात्र , आता मागणी मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे जानवली ग्रामस्थ शिवराम राणे, अमोल राणे, संतोष सावंत, दामोदर सावंत यांनी यावेळी सांगितले.या लाक्षणिक उपोषणाच्यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्रिया सावंत,सरपंच आर्या राणे,माजी पोलीस पाटील पांडुरंग राणे,बाळा राणे,भगवान दळवी,राजू शेटये,शैलेश भोगले,अँड . हर्षद गावडे,चंदू साटम,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी सावंत,प्रकाश राणे,रामदास विखाळे, विनायक राणे,सत्यवान राणे,प्रकाश राणे,संदीप सावंत,अशोक राणे, दीपक बुकम आदी जानवली ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपोषणाबाबतचे निवेदन जानवली ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांसह राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, मारुती मंदिर केंद्रशाळा ही रस्त्याच्या पलीकडे आहे.या शाळेत १०० पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. यातील सुमारे ६० विद्यार्थ्यांना शाळेत ये- जा करावी लागते . बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल मधील मुलेही याच मार्गाने जात असतात. तर स्मशान भूमी हि होडीचे साना येथे आहे.साकेडीला जाणाऱ्या एस.टी.च्या ८ फेऱ्या होत असतात.जिल्हा कृत्रीम रेतन केंद्र,पशु संवर्धन दवाखान्यात शेतकऱ्यांच्या जनावरांना ने आण करणे तसेच ग्रामपंचायत कार्यालय ,तलाठी कार्यालय,रेशनींग दुकान आहे.तसेच होडीचे साना येथे जानवली नदीवर फुटब्रिज होणार असून कणकवली शहराकडे जाण्यासाठीचा जवळचा मार्ग ठरणार आहे.जानवली गावचे ग्रामदैवत वार्षिक जत्रोत्सवाच्यावेळी होडीचा साना येथे असलेल्या ब्राम्हणदेव भेटीसाठी जात असतात. त्यावेळी देव जाण्यासाठीचा तेथून मार्ग असल्याने जानवली-साकेडी तिठा येथे बॉक्सवेल होणे महत्वाचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.उपोषणस्थळी लोकप्रतिनिधींची भेट !या उपोषणस्थळी आमदार नितेश राणे,माजी आमदार प्रमोद जठार तसेच शिवसेना नेते संदेश पारकर आदी लोकप्रतिनिधींनी भेट दिली.तसेच शासनस्तरावर पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.