ओरोस : शैक्षणिक विषयक भौतिक व आर्थिक लक्ष ठरविण्यासाठी राज्यातील सर्व शाळांची माहिती यू-डायस प्लस या आॅनलाइन प्रणालीद्वारे संगणकीकृत करण्यात येणार आहे. जीआयएस मॅपिंगद्वारे शाळांची माहिती उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७३८ पैकी १६२० शाळांनी आॅनलाइन माहिती भरली असून ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
ही माहिती भरण्यात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वलस्थानी आहे. ही माहिती भरण्यास शासनाने १० में पर्यंत मुदतवाढ दिली असून उर्वरित ७ टक्के शाळांनी या यू-डायस प्लस प्रणालीत माहिती भरून सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी ठेवावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांची विविध विषयक माहिती यू डायस प्रणालीमध्ये आॅफलाइन पध्दतीने माहिती फिड केली जात होती. आता मात्र ही माहिती जमा करण्यासाठी केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालय व समग्र शिक्षा या योजनेच्या तांत्रिक सहायक ग्रुप कार्यालयाने राष्ट्रीय सूचना कार्यालयामार्फत यू-डायस प्लस प्रणाली कार्यान्वित केली आहे.
याचा उपयोग केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग, शिष्यवृत्ती, आदिवासी, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण, मध्यान्ह भोजन योजना या विभागासाठी उपयोगात येणार आहे. समग्र शिक्षा विभागाचे सन २०१९-२० या वर्षाचे वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी माहितीचा उपयोग होणार आहे.
मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, भौतिक सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, डिजिटल स्कूल, आयसीटी लॅब, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, व्यवसाय शिक्षण, दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा याबाबतीत भौतिक व आर्थिक लक्ष ठरविण्यासाठी जमा झालेली माहिती वापरण्यात येणार आहे. याच माहितीवरुन विविध योजनांसाठी शासनाला अनुदान मंजूर करणे सहज शक्य होणार आहे.१0 मे पर्यंत मुदतवाढशाळास्तरावर संगणक प्रणालीवर माहिती नोंदविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. माहिती भरण्यासाठी शाळांना येत्या ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता ही माहिती भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही माहिती भरण्याचे ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. १७३८ शाळांपैकी १६२० शाळांनी ही माहिती आॅनलाइन भरली आहे. ही माहिती भरण्यात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी आहे. यात जिल्हा राज्यात अव्वल ठेवण्यासाठी उर्वरित ७ टक्के शाळांनी या यू-डायस प्लस प्रणालीत माहिती भरावी असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.