सावंतवाडी : राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पदवीवरून भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे पूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली होती. सामंत यांनी पदवी खरी असेल, पण हा माणूस 100 टक्के बोगस आहे, असा आरोप केला होता. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सावंतवाडीत येऊन निलेश राणे यांचे कान टोचले आहेत.
पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी सामंत यांच्या पदवीबद्दलची माहिती मिळवली आहे. त्यानंतर विरोधकांनी सामंत यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझी आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची चौकशी करा, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे. ‘ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो यात मला कमीपणा वाटत नाही’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आज चंद्रकांत पाटील हे सावंतवाडीमध्ये विजयी रॅलीसाठी आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर टीका केली. नवे सरकार फक्त खाते आणि बंगले वाटपात गुंतले आहे. पीक कर्ज व मध्यम पीक कर्ज यातील फरकतरी उध्दव ठाकरेंना कळतो का? असा सवाल करत कर्जमाफी फसवी आहे. खाजगी बँकेची पीक कर्जमाफी कशी करणार, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
सावरकरांबाबत शिवसेनेची भुमिका काय ती जाहीर करावी, काँग्रेस टीका करते, मग त्यावर उत्तर देत नाही. सावरकर यांचे नातेवाईक मुख्यमंत्र्यांना फोन करतात, पण ते फोन का उचलत नाहीत? जनादेश आमच्या बाजूने असल्याने उठसूठ टीका आम्ही करणार नसल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी उदय सामंत यांच्या पदवीवरही भाष्य केले. त्यांची पदवी खरी आहे, मग टीका कशाला करायची, ही टीका निरर्थक आहे असे सांगत पदवी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.