कणकवली: सावडाव येथे रस्त्याच्या कामावरून एका महिलेला मारहाण करण्यात आली. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. मारहाण करणाऱ्याना पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही. पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. याउलट पोलिस ठाण्यात आलेल्या आरोपींना परस्पर विरोधी तक्रार करता यावी यासाठी रुग्णालयात पाठविल्याचा आरोप उध्दवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याप्रकरणी शिवसेना आंदोलनात्मक भूमिका घेणार आहे. पोलिस यंत्रणेकडून न्याय न मिळाल्यास, यापुढे असे प्रकार घडल्यास पोलिस ठाण्यात नागरिकांनी जाऊ नये, असे प्रतिकात्मक फलक ठिकठिकाणी लावण्यात येतील असा इशारा उध्दवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिला. माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली, सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, महिला आघाडीप्रमुख निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने पोलिस ठाण्यावर धडक देत निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेतली. यावेळी तालुका प्रमुख कन्हैया पारकर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, धीरज मेस्त्री, राजू राठोड यांच्यासह सावडाव ग्रामस्थ उपस्थित होते.सावडाव स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून प्रमोद नरसाळे, वैभव सावंत व एक महिला यांना रविवारी सायंकाळी मारहाण करण्यात आली. तसेच विनयभंग करण्यात आला असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. उलट पोलिस ठाण्यात आलेल्या आरोपींना परस्पर विरोधी तक्रार करता यावी यासाठी रुग्णालयात पाठविल्याचा आरोप उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, प्रमोद नरसाळे यांची सावडाव स्मशान भूमीकडे रस्त्यावर जमीन आहे. त्या जमिनीत जेसीबीने खोदकाम करत असताना दत्ता काटे व अन्य व्यक्तींनी त्यांना खोदकाम करण्यास अटकाव केला तसेच मारहाण केली. त्यावेळी तेथे गेलेले सामाजिक कार्यकर्ते वैभव सावंत व एक महिला यांनाही गंभीर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे. संशयित दत्ता काटे व त्याचे अन्य सहकारी यांनी वैभव सावंत व एक महिला यांना अमानुषपणे मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिस संशयितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. ज्यावेळी संशयित पोलिस ठाण्यात आले होते त्यावेळी ते नशेत असल्याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला. दरम्यान, ज्या जागेचा वाद आहे, ती जागा खासगी मालकीची आहे. तेथे यापुर्वी लावलेली काजू कलमे काढून टाकण्यात आली. गडगा पाडण्यात आला. आता जेसीबीने चर मारत असताना ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप जमिन मालक नरसाळे कुटुंबियांनी यावेळी केला. मारहाण झालेल्या महिलांनी आपली कैफियत पोलिसांसमोर मांडली.
सावडाव मारहाण प्रकरणी उद्धवसेना आक्रमक; कणकवली पोलिस ठाण्यावर धडक, अधिकाऱ्याना विचारला जाब
By सुधीर राणे | Updated: April 15, 2025 11:39 IST