कणकवली: इंडिया आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार तथा उद्धवसेना पक्षाचे सचिव विनायक राऊत यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धवसेना पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असताना संदेश पारकर यांनी संघटनात्मक बांधणी करत पक्षाला चांगली दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा विजय झाला. त्यातच कणकवली विधानसभा मतदार संघ व जिल्ह्यातून मोठे मताधिक्य राणेंना मिळाले. त्यामुळे राऊत यांचा पराभव झाल्याचे शल्य मनात बाळगुन संदेश पारकर यांनी नैतिकता जोपासत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांचे लक्ष वेधले आहे. त्याची प्रत उद्धवसेना पक्ष सचिव विनायक राऊत, जिल्हासंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनाही पाठवली आहे. त्यामुळे उद्धवसेनेत खळबळ उडाली आहे. दरम्यान, विनायक राऊत यांचा पराभव झाल्याने शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा पसरली आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय पक्षाच्या बैठकांमध्ये विनायक राऊत हे सर्वच पदाधिकारी व शिवसैनिकांना एका पराभवाने खचून न जाता आगामी निवडूकांसाठी सज्ज व्हा असे आवाहन करतात तर दुसरीकडे त्या बैठकांमध्ये उपस्थित असलेले जिल्हाप्रमुख संदेश पारकर हे पदाचा राजीनामा देत जबाबदारीतुन मुक्त होण्याची जाहिर भुमिका घेताना दिसत आहेत.
उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा राजीनामा
By सुधीर राणे | Published: June 17, 2024 3:04 PM