सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनी अदाणीच्या घश्यात घालण्याचे काम सुरू असून कोल्हापूर, सिंधुदुर्गच्या सीमेवर गोल्फ कोर्ससाठी मंत्री दीपक केसरकर व गोव्यातील उद्योगपती जमिनी शोधताहेत. शेतकऱ्यांनी आपला सात बारा सांभाळून ठेवावा असे सांगत शिवसेना उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल चढवला. तसेच दहशतवाद कायमचा संपवायचा असेल तर जिल्ह्यात बदल घडवावाच लागेल असे आवाहनही ठाकरे यांनी केले.सावंतवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ गांधी चौकात सभा पार पडली. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार सुधीर सावंत, प्रविण भोसले, राजन तेली, परशुराम उपरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.उद्धव ठाकरे Uddhav Thackeray म्हणाले, लोकसभा निवडणुकीत थोडी चुक झाली. पण आता चुक सुधारण्याची संधी आली असून तुम्हाला बदल घडवावाच लागेल. नाहीतर आपणास पुढची पिढी माफ करणार नाही. अन्यथा कायमचा दहशतवाद स्वीकारावा लागेल. यासाठी सर्वांनी जागृत होऊन काम करा असे आवाहन केले. येथील आमदार 'खाल मुडी पातळ धुडी आहेत' नेहमी खालून वाकून बोलतात त्यामुळे आता येथील जनतेने सावध व्हावे नाहीतर कधी याठिकाणी मायनिंग सारखे उद्योग येतील सांगता पण येणार नाहीत अशी खिल्ली उडवली...अन्यथा तुमचा सात बारा अदाणीच्या नावे होईल सावंतवाडीतील आरोग्याचा प्रश्न ज्यांना सोडवता आला नाही ते तुमचा काय विकास करणार असा सवाल करत आता सर्वांनी आपले सात बारा जपून ठेवा अन्यथा तुमचा सात बारा कधी अदाणीच्या नावे होईल सांगता येणार नाही. येथील मंत्री दीपक केसरकर व गोव्यातील उद्योगपती हे कोल्हापूर सिंधुदुर्ग च्या सीमेवर अडाणी साठी गोल्फ कोर्स साठी जमिनी शोधताहेत म्हणजे कोकणपण अदाणीच्या घशात घालण्याचे काम सुरू झाले आहे असा आरोप ठाकरे यांनी केला.राऊत यांनी महायुतीवर टीका करतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंधरा वर्षात एकही उद्योग आणला नाही म्हणून रोजगारासाठी सर्वांना बाहेर जावे लागत आहे असा आरोप केला. तर राजन तेली यांनी मला व माझ्या कुटुंबाला धोका असून तुम्ही माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्या, मी जिल्ह्यातील सेनेची जबाबदारी घेतो माझे काय होईल त्याचा विचार करणार नाही असे सांगितले.
Uddhav Thackeray सिंधुदुर्गातील जमिनी अदाणीच्या घश्यात घालण्याचा डाव, उद्धव ठाकरेंचा घणाघात
By अनंत खं.जाधव | Published: November 13, 2024 3:48 PM