मुंबई : शिवसेनेच्या कणकवलीतील सभेला मुंबईवरून भाडोत्री अमराठी माणसे आणल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. या बाबतचा व्हिडिओही त्यांनी ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी कणकवलीमध्ये प्रचारसभा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकाच मतदारसंघात दोन सभा घेतल्या. एकाच मतदार संघात पहिली सभा झाल्यानंतर देखील दुसऱ्या सभेला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा मला अभिमान वाटतो, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावर नितेश राणे यांनी हा त्यांचा दावा फोल ठरवणारे ट्विट केले आहे.
याबाबतचा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी शिवसेनेच्या सभेसाठी मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी येथून माणसे गोळा केल्याचा आरोप केला. तसेच या व्हिडिओमध्ये शिवसेनेच्या प्रचारसभेला आलेला अमराठी तरुण मुंबईहून 50 गाड्या घेऊन आल्याचे सांगताना दिसत आहे.
कणकवलीतील सभेवेळी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडले होते. शिवसेनेने काय केले असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. मात्र आम्ही काय केले हे येथील जनतेला ठावूक आहे. विरोधकांनी जर पुन्हा आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ठेचून काढू. आमच्याकडे आता असे पुरावे आहेत की आम्ही तुम्हाला पुरून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला होता. तसेच कोकणची जनता साधीभोळी आहे पण मर्द आहे, बरोबर वाट बघते आणि वाट लावते, असा टोलाही त्यांनी लगावला होता.