कणकवली: कणकवली विधानसभा मतदारसंघात आम्ही अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास असून आमच्याशी लढा द्यायला विरोधकांकडे उमेदवार नाही. त्यामुळे आम्हाला रोखू शकत नसल्याने कणकवलीत सभा घेत शिव्या घालण्याचे काम काही लोकांकडून झाले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात खासदार झालेल्या विनायक राऊत यांनी गेल्या १० वर्षात काय केले? हे त्यांना सभेत सांगता आले नाही. त्यामुळे भाजपा आणि राणे कुटुंबियांवर विरोधकांनी फक्त टीका केली. कालची ठाकरे सेनेची सभा म्हणजे खासदार विनायक राऊत यांच्या निरोपाची सभा झाली असल्याची टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.तसेच एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे भाजपा सोबत विनाअट युती करण्यासाठी प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी द्यायचा अशी सध्याची स्थिती आहे.असा गौप्यस्फोट ही त्यांनी यावेळी केला. कणकवली येथे आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राणे म्हणाले, ठाकरे सेनेची रविवारी सभा झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला नाहक त्रास झाला. मला अनेक लोकांचे फोन आले. ते म्हणाले ज्यांनी ज्यांनी तुमच्यावर टीका केली, त्यांना आम्ही मतदानातून उत्तर देणार आहोत. महायुतीच्या माध्यमातून गावागावात विकासकामांची भूमिपूजने केली आहेत. त्यामुळे मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. विकास करण्यासाठी माझ्या मतदारांनी मला निवडून दिले आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने वातावरण खराब करायचे नाही, असे आम्ही ठरवले आहे.उद्धव ठाकरे मोठे गद्दार उद्धव ठाकरे हे किती मोठे गद्दार आहेत, हे राज्याने पाहिले होते. मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपा सोबत युती असताना कणकवलीत माझ्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार उभा केला. स्वतः जाहीर सभा घेतली. तरीही २०१९ मध्ये मोठ्या मताधिक्याने मी विजयी झालो. ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्के पेक्षा जास्त सरपंच भाजपाच्या विचारांचे निवडून आले आहेत. काही त्यांचे आले तेही आमच्याकडे प्रवेशासाठी वेटींगवर आहेत. तसेच काल जे व्यासपीठावर होते, त्यांचेही मत लवकरच बदलेल. माझे आणि जनतेचे अतुट नाते आहे. जो कोण विरोधी उमेदवार उभा राहील त्याच्या विरोधात मी लढणार आहे. कालच्या सभेत जिल्हाभरातून तसेच राजापूरमधून लोक आणले. कोकणात बाळासाहेब ठाकरे यांची लाखोंची सभा होत होती. आता उद्धव ठाकरे कॉर्नर सभा घेत फिरत असल्याची टीका नितेश राणे यांनी केली.राणे संपले म्हणाचं, पण..विनायक राऊत यांची शेवटची निवडणूक आहे. आम्हाला कोणावरही टीका करायची नाही. आता माझ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आलेले आहेत. त्यामुळे मतदारसंघात विकासाच्या मुद्यावर आम्ही बोलू. एका बाजूला बोलायचे राणे संपले, मग बांदा ते खारेपाटण पर्यंत राणेंचे नाव घेतल्याशिवाय तुमची एकही सभा का होत नाही ? याचे उत्तर ठाकरे सेनेच्या लोकांनी द्यावे.
ही तर विनायक राऊत यांच्या निरोपाची सभा, नितेश राणे यांचे टीकास्त्र
By सुधीर राणे | Published: February 05, 2024 6:53 PM