वेंगुर्ला : दोन दिवसांपूर्वी प्लॅस्टरचे काम करणा-या तरुणाचा शॉक लागून मृत्यू बळी गेल्यानंतर उजेडात आलेल्या अनधिकृत बांधकाम शुक्रवारी सकाळपासून तोडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान हे काम सुरू असल्याने नगरपरिषदेने त्या भागातून जाणारी वाहतूक बंद ठेवली आहे. मात्र अनधिकृत बांधकाम तोडले जात असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.वेंगुर्ला शहरात बंदर रोडला लागून ग्रामीण रुग्णालयानजिक विनायक परब यांची इमारत आहे. तळमजला व वरचा मजला अशी दोन्ही बांधकामे झाल्यावर दुस-या मजल्याचे बांधकाम अनधिकृतरित्या सुरु होते. या दुस-या मजल्याचे प्लॅस्टरींगचे काम करताना शहरातील शुभम बाळू इंदुलकर या युवकास इमारतीच्या बाजूने जाणा-या ११ के. व्ही विद्युतभारित वाहिनीच्या विजेचा शॉक लागून २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.
या मृत्यूप्रकरणी त्याचे मामा जानू दत्तू तोडकर याने वेंगुर्ला पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार इमारत मालक विनायक परब व ठेकेदार तिलकराज गोंडा या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. २८ तासानंतर त्या तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्घटनेमुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त होत होता. तसेच संबंधित अनधिकृत बांधकाम तत्काळ तोडून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत होती.हे लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने इमारत मालक परब यांना बुधवारी लेखी नोटीस देऊन अनधिकृत बांधकाम २४ तासात तोडावे असे कळविले होते. तसेच आपल्याकडून तसे न झाल्यास नगरपरिषद ते बांधकाम तोडणार असे स्पष्ट केले होते. नोटीस मिळताच आपले आणखी नुकसान नको या भीतीने परब यांनी सकाळ पासून ते अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे.