सावंतवाडी : वेत्ये येथील दगडखाणीत बिगर परवाना काळा दगड उत्खनन केल्याप्रकरणी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी एका कंपनीला १९ लाख ५९ हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे.
येत्या पंधरा दिवसांत दंडात्मक रक्कम जमा केली नाही तर जमीन महसूलची थकबाकी म्हणून वसूल केली जाईल, असे म्हटले आहे. वेत्ये येथे काळा दगड उत्खनन बेकायदेशीर सुरू आहे. पण महसूल अधिकारी कानाडोळा करीत असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांनी याबाबत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे तक्रार केली.या तक्रारीस अनुसरून मंडळ अधिकारी आजगाव यांनी बिगर परवानगी उत्खनन केल्याप्रकरणी अहवालानुसार म्हात्रे यांनी दंडात्मक कारवाईचा आदेश दिला. वेत्ये येथील सर्व्हे नंबर एक ९४/१ व ९४/५८ मिळकतीमध्ये बिगरपरवाना १३९९.२९ ब्रास उत्खनन केले होते. तसे आजगाव मंडळ अधिकारी यांनी पंच यादीत नमूद केले आहे. या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर कंपनी व्यंकट जयचंद्र इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड बांदा यांना तहसीलदार म्हात्रे यांनी दंडात्मक कारवाईचा आदेश बजावला आहे.सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांनी याबाबत लेखी तक्रार दिली. त्यानुसार ही कारवाई झाल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. पंधरा दिवसांत ती रक्कम जमा केली नाही तर जमीन महसूल थकबाकी म्हणून वसूल केली जाईल, असा आदेशदेखील तहसीलदारांनी बजावला आहे. वेत्ये, क्षेत्रफळ, इन्सुली व सोनुर्ली भागात काळा दगड उत्खननप्रकरणी तक्रारी असूनही महसूल अधिकारी दाद देत नाहीत, अशा तक्रारी आहेत.