कणकवली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली असलेले अनधिकृत स्टॉल हटविण्याची मोहीम अखेर आज, शुक्रवार पासून सुरू करण्यात आली. यावेळी स्टॉलधारकांचा विरोध होण्याची शक्यता असल्याने, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कणकवली येथील नरडवे चौक येथून अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. जे स्टॉलधारक आपला स्टॉल स्वतःहून बाजूला घेऊ इच्छित होते. त्यांना वेळ देण्यात आला. तर जे स्टॉलधारक विरोध करत आहेत, त्यांचे स्टॉल हटवण्यात आले. दरम्यान आपली रोजीरोटी असणार स्टाॅल हटवताना पाहून स्टाॅलधारकांच्या डोळ्यांमध्ये अश्रूही दिसून आले. कारवाई दरम्यान पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, बापू खरात, महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता महेश फटी, कनिष्ठ अभियंता एम. आर. साळुंखे, रुपेश कांबळे आदीही घटनास्थळी उपस्थित होते.मोहीमेत यापुढेही सातत्य ठेवणार - महेश खटी आमचा कुठल्याही स्टॉलधारकांना त्रास देण्याचा हेतू नाही. महामार्ग प्राधिकरणच्या जागेत अनाधिकृत बांधकाम झालेली असतील तर तीही हटविण्यात येतील. तसेच उड्डाणपुलाखाली अनेक वाहने उभी करून ठेवण्यात आलेली आहेत. त्यावरही निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. यामोहिमेत ६० हून अधिक स्टॉल हटविण्यात आले आहेत. यापुढील काळातही अनधिकृत स्टॉलवर कारवाई केली जाईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सावंतवाडी येथील उपअभियंता महेश खटी यांनी दिली.
कणकवलीत महामार्ग उड्डाणपुलाखालील अनधिकृत स्टॉल हटाव मोहीमेस प्रारंभ, कडक पोलिस बंदोबस्त
By सुधीर राणे | Published: March 17, 2023 5:07 PM