मंडणगड : वन विभागाच्या आशीर्वादाने तालुक्यातील काही लाकूडमाफियांनी बांधकाम विभागाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करुन रस्त्यांशेजारील आकेशिया झाडांची खुलेआम कत्तल सुरू ठेवली आहे. त्यामुळे दोन्ही विभागातील वरिष्ठांनी वृक्षतोडीचे समर्थन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या सर्वच आकेशियाच्या वृक्षतोडीचे सत्र गेल्या आठवड्यात सुरु झाले असून, यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही प्रमुख रस्त्यांशेजारची वृक्षतोड अद्याप थांबलेली नाही.सावरी घोसाळे पट्ट्यातील गावांमधून आकेशियाची तोड करुन गाड्या भरुन जात असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. यासंदर्भात बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार विभागाने वृक्ष तोडण्यासाठी कुठलाही अधिकृत लिलाव केलेला नाही. मात्र, वाहतुकीस अडचण ठरणारी, वाकलेली झाडे तोडण्याची सूचना येथील अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात दिल्याची माहिती मिळाली आहे.कायदा व प्रक्रियेला फाटा देऊन बांधकाम विभागाने हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असली तरी वृक्षतोड करताना बांधकाम विभागाचे अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी जागेवर उपस्थितच न राहिल्याने वाहतुकीस अडथळा असलेली झाडे वगळता इतर सर्व झाडे तोडून साफ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वृक्षतोडीसाठी पुढे असलेल्या लाकूडमाफियांना येथील वन खात्याच्या प्रमुखांचा पाठिंबा असल्याचेही त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे. बांधकाम विभागाकडे अपुरे मनष्यबळ असल्याने असे प्रकार घडत असल्याचे येथील अभियंत्याचे मत आहे. दुसरीकडे कोणत्याही प्रक्रियेविना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडतोडीचे आदेश निर्गमित केलेच कसे? हासुध्दा मुख्य प्रश्न यानिमित्ताने पुढे येतो.लाकूडमाफिया, बांधकाम व वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे त्रिकूट जमण्यामागे अर्थकारणाचे झाले असल्याची चर्चाही सुरु आहे. वृक्षतोडीमुळे शासनाचा महसूल बुडत आहेच, मात्र, कारवाई होत नसल्याने लाकूडमाफियांचे धारिष्ठ्य वाढले आहे. मंडणगडमध्ये सुरु असलेली झाडांची बेकायदा कत्तल थांबवण्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)1गाड्या भरून वाहतूकमंडणगडात आकेशियाची वृक्षतोड होत असून, त्याकडे वन विभाग दुर्लक्ष करत आहे.2बांधकाम विभागाच्या ताब्यात हा परिसर आहे. मात्र, बांधकाम खात्यानेही दुर्लक्ष केले आहे.3रस्त्याशेजारी वृक्षतोड होत आहे आणि कोणत्याही शासकीय यंत्रणेला त्याचा पत्ताच नाही.
आकेशियाची बेसुमार तोड
By admin | Published: August 19, 2015 11:36 PM