कणकवली : कणकवली पंचायत समितीला १४ व्या वित्त आयोगा अंतर्गत ६ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी गेल्या तीन वर्षात प्राप्त झाला होता. मात्र, अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे गेल्या तीन वर्षात ४ कोटी ९५ लाख एवढा निधी अखर्चित राहिला आहे. या निधी अखर्चित रहाण्यास कोण जबाबदार आहे ? असा जाब गटविकास अधिकारी मनोज भोसले यांना पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत यांनी विचारला. या मुद्यावरून अन्य सदस्यही आक्रमक झाले.त्यावर निधी अखर्चित ठेवणाऱ्या ग्रामसेवकांना यापूर्वीच नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर पुढील काळात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले.कणकवली पंचायत समिती सभा परमहंस भालचंद्र महाराज सभागृहात सभापती सुजाता हळदिवे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसभापती सुचिता दळवी, गटविकास अधिकारी मनोज भोसले उपस्थित होते.या सभेत प्रामुख्याने १४ व्या वित्त आयोगातून उपलब्ध निधिचा मुद्दा चर्चेत आला. या वित्त आयोगातून कणकवली तालुक्यातील विकास कामांसाठी प्राप्त झालेल्या निधी पैकी ४ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने पंचायत समिती सदस्य संतप्त झाले. तसेच त्यानी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. निधी अखर्चित ठेवून विकास कसा साधणार? अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.त्यावर गटविकास अधिकारी यांनी यासंदर्भात आम्ही पाठपुरावा करत आहोत. ग्रामसेवकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. संबंधित विभागामार्फत अंदाजपत्रके मागविण्यात आली आहेत.हा निधी अखर्चित राहणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ असे आश्वासन यावेळी दिले .कणकवली तालुक्यातील खड्डेमय झालेल्या रस्त्यांबाबत प्रकाश पारकर यांनी बांधकाम विभागाला जाब विचारला. तसेच कासार्डे येथील पुलाबाबत सातत्याने पाठपुरावा करून ते पुल का होत नाही? अशी विचारणा उपअभियंता कोरके यांच्याकडे केली. त्यावर या पुलाचा प्रस्ताव नाबार्डकडे पाठविण्यात आला आहे. तसेच सभापतींनी हा पुल होण्यासाठी सभागृहाचा ठराव घेण्याची सूचना केली.खारेपाटण, कासार्डे, तळेरेसह तालुक्यात बीएसएनएलची सेवा ग्राहकांना मिळत नाही. अधिकारी खाजगी कंपनींना मॅनेज झालेले असल्याचा आरोप दिलीप तळेकर यांनी केला. यावर उत्तर देताना बीएसएनएलच्या अधिकाऱ्यानी महामार्गाचे काम सुरू असल्याने अडचणी येत असल्याचे सांगितले.तरीपण सेवा सुरळीत करण्याचे आमचे प्रयत्न असतील, असे आश्वासन त्यांनी दिले.अवकाळी पावसाने आंबा, भात, काजू पिकाचे लाखे रूपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मागील सभेत कृषी अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईचा अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अहवालाचे काय झाले? त्याचबरोबर कृषी अधिकारी मागील तीन सभांना का अनुपस्थित राहिले, याचा खुलासा सभागृहात व्हावा, अशी मागणी मिलींद मेस्त्री यांनी केली.त्यावेळी कृषी अधिकारी विठ्ठल राठोड यांनी आम्हाला महसुल विभागाकडून पंचनामे करण्याचे कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे पंचनामे केले नसल्याचे सांगितले. मग मागच्या सभेत तुमच्या अधिकाऱ्याने पंचनामे केले असल्याचे का सांगितले? या मुद्यावर कृषी अधिकाऱ्यांना गणेश तांबे व अन्य सदस्यांनी धारेवर धरले.सभेला विज वितरणचे अधिकारी अनुपस्थित का राहतात? असलदे येथील परब यांच्या बैलाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला होता़. दीड वर्षे झाले तरी त्याला मदत अद्यापही मिळालेली नाही. कोळोशी येथील काही शेळ्या विजेच्या धक्क्याने दगावल्या आहेत.
या सर्व प्रकाराबाबत विज वितरणची उदासिन भूमिका असून अद्यापही या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही, असा मुद्दा हर्षदा वाळके यांनी उपस्थित केला. त्यालाच जोडून कासार्डे व अन्य गावांमध्ये अनेक विद्युत खांब गंजेलेल्या अवस्थेत असून धोकादायक बनले आहेत. भविष्यात जिवित हाणी होण्याची शक्यता आहे. तर संबधित विभागाला लेखी पत्रव्यवहार या सभागृहाने करावा, अशी मागणी प्रकाश पारकर, हर्षदा वाळके यांनी केली.कासार्डेत महामार्ग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून शिल्लक राहिलेले जेवण बाहेर टाकले जाते. ते अन्न खावून तीन बैलाचा मृत्यू झाला. त्याची नुकसान भरपाई कोण देणार? संबंधित ठेकेदार कंपनीचे अधिकारी ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दिलीप तळेकर, प्रकाश पारकर यांनी केला. संबंधित ठेकेदाराचे ३०० ते ४०० कर्मचारी त्या भागात राहतात़.त्यांनी शौचालयाची काय व्यवस्था केली आहे? याची तपासणी आरोग्य अधिकाऱ्यानी करावी, अशी मागणी केली.या सभेत आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल भगवान लोके यांचा पंचायत समितीच्यावतीने सभापती सुजाता हळदिवे यांनी सत्कार केला. तसेच पंचायत समिती स्तरावरील विविध विभागाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पियाळी शाळेतील शिक्षकांनी ग्रामस्थांविरोधात दिलेल्या तक्रारीबाबत माहिती देण्याची मागणी प्रकाश पारकर यांनी केली होती. यासह विविध मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली.