वेंगुर्ला : वेंगुर्ला शहरात सध्या भूमिगत वीजवाहिनी घालण्याचे काम सुरू असून ते करताना ठेकेदार अनागोंदी करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनीष सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.ॲड. सातार्डेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे की, शहरात सध्या भूमिगत वीजवाहिनी घालण्याचे काम सुरू असून, त्यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत. खोदकाम करताना वाहतुकीसाठी लागणारे कोणतेच नियोजन ठेकेदाराने तथा संबंधित प्रशासनाने केलेले नाही.
ठेकेदार आपल्या मनमानीप्रमाणे रस्त्यांची खोदाई करीत असून, या खोदाईवेळी लागणारे वाहतुकीचे नियोजन नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याचा प्रचंड त्रास वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना देखील होत आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदून मातीचे ढिगारे करून ठेवल्याने त्याचादेखील प्रचंड त्रास शहरातील नागरिकांना होत आहे. सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे.या धुळीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. माती रस्त्यावर टाकल्याने वाहने घसरून छोटे-मोठे अपघातदेखील होत आहेत. एखादा मोठा अपघात होऊन त्यात कोणाला आपले प्राण गमवावे लागल्यास किंवा गंभीर दुखापत झाल्यास त्यास केवळ संबंधित ठेकेदार तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी व वेंगुर्ला नगरपरिषद जबाबदारअसेल.
त्यामुळे संबंधित ठेकेदार तसेच संबंधित प्रशासन व वेंगुर्ला नगरपरिषद यांनी वाहतुकीचे योग्यरित्या नियोजन करून तसेच वर नमूद बाबींची योग्य ती काळजी घेऊन मगच रस्ते खोदाईचे काम करावे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम संबंधितांना भोगावे लागतील, असा इशाराही ॲड. सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.