कुडाळ : महाराष्ट्र राज्य स्थापनेला १ मे रोजी ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. अर्धे शतक उलटून गेल्यानंतरही वर्षाला सुमारे २०० ते २५० इंचापेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या सिंधुुदुर्ग जिल्ह्यात आजच्या घडीला सुमारे ५०० हून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य झाले आहे. ही गोष्ट सर्व जनता आणि राजकर्त्यांसाठी लाजिरवाणी असल्याचे मत सिंधुदुर्ग जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे जिल्हा संयोजक महेश परूळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले आहे.पत्रकात परूळेकर यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील पाण्याच्या दुर्भीक्ष्याबाबत माहिती मिळवली असता समोर आलेली वस्तुस्थिती जिल्हावासीयांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. जानेवारी ते मार्च या वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या सरकारी आकड्यानुसार पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणाऱ्या गावांची संख्या ५०० च्या वर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यातील तिलारी धरणाचे पाणी गोव्यात पोहोचले असताना तिलारी धरण असलेल्या दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांच्या वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य असल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या प्रसिद्धीपत्रकातून मिळाली आहे. सावंतवाडीचे बापूसाहेब महाराज यांनी केसरी फणसवडे येथून सावंतवाडी संस्थानासाठी नैसर्गिक पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली. परंतु नंतरच्या काळातील राज्यकर्त्यांनी सावंतवाडीच्या आंबोली, कुणकेरी, तळगाव, चौकुळ, धोकोरे, रोणापाल, दांडेली, कारिवडे, डेगवे, ओटवणे या खेड्यापाड्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कुडाळमध्ये ३५ वर्षांपूर्वी टाळंबा धरणाचे काम सुरू केले. परंतु धरणामुळे ना पाणी आणि ना पुनर्वसन अशी हलाखीची परिस्थिती माणगाव खोऱ्यातील अनेक गावांची झाली आहे, असे परुळेकर यांनी म्हटले आहे. विनाशकारी प्रकल्प संघर्ष समिती ही गोष्ट सहन करणार नाही. टँकरचा थातूरमातूर पाणी पुरवठा नको. १ मे महाराष्ट्र दिनापासून सुरुवातीला पाण्याचे दुर्भीक्ष्य असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील गावे व त्यानंतर माणगाव खोरे, देवगड तालुक्यातील विजयदुर्ग विभाग यांचा सलग दौरा करून या तिन्ही तालुक्यात पाणी प्रत्येक घरी मिळण्यासंदर्भात जनजागृती आणि जनतेच्या पाठींब्यानुसार आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी गावोगावी फिरणार असल्याचे परूळेकर यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)तिलारी धरणाचे पाणी गोव्यात पोहोचले असताना दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांच्या वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य असल्याची नोंद.सावंतवाडीचे बापूसाहेब महाराज यांनी केसरी फणसवडे येथून सावंतवाडी संस्थानासाठी नैसर्गिक पाणी पुरवठ्याची केली व्यवस्था.माणगा खोऱ्यातील गावांची स्थिती हलाखीची : परुळेकर
पाचशेहून अधिक गावात पाण्याचे दुर्भीक्ष्य
By admin | Published: April 29, 2015 10:03 PM